कर्तव्याचे पालन करतांना पोलिसांमध्ये नेहमी दिसून येणारी कर्तव्यचुकारता आणि कायद्याच्या पालनाविषयीची उदासीनता !

सुराज्य स्थापनेचे एक अंग : आदर्श पोलीस

पोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते, त्यांचे चित्रपटांंमध्ये दाखवले जाणारे खलनायकीकरण यांमुळे आणि अनेकदा स्वत:च्या अनुभवांमुळे पोलीस अन् समाज यात अंतर पडल्याचे दिसून येते. हे खरेतर पालटायला हवे. समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत. – संपादक  

१. पोलिसांनी तक्रारी नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणे

दखलपात्र गुन्ह्याची माहिती प्राप्त झाल्यावर पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंद करून वरिष्ठांना कळवणे आणि त्या गुन्ह्याला प्रतिबंध करणे, हे पोलिसांचे आद्यकर्तव्य आहे. दखलपात्र गुन्ह्याची तक्रार करण्यासाठी स्वत: तक्रारदार पोलीस ठाण्यात येऊनही काही पोलीस अधिकारी गुन्हा नोंदवून घेत नाहीत, टाळाटाळ करतात किंवा तक्रारदाराला हाकलून लावतात. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचा दबाव आल्यावरच गुन्हा नोंदवला जातो. एवढेच कशाला, साधा तक्रार अर्ज घेऊन गेले, तरी पोलीस धुडकावून लावतात. हा सर्वसामान्य जनतेचा पोलिसांविषयीचा अनुभव आहे.

२. न्यायाधीश आरोपीला विचारतात; म्हणून त्याला न्यायालयात उपस्थित करण्यापूर्वी मारहाण न करणे

अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयामध्ये उपस्थित करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यापूर्वी त्याला मारहाण करण्याचे टाळले जाते. न्यायालयामध्ये उपस्थित झाल्यावर न्यायमूर्ती आरोपीला, ‘पोलिसांनी मारहाण केली का ?’, असे विचारतात. हे सर्व टाळण्यासाठी अटकेत असलेल्या आरोपींची पोलीस वैद्यकीय तपासणी करतात.

३. मद्यधुंद, मद्यपी, गर्दुल्ला वेड्या व्यक्ती यांना तक्रारीविना पोलीस कधीच स्वत:हून कह्यात घेत नाहीत; कारण ते पोलिसांनाच त्रासदायक ठरतात.

४. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार (काही अपवादात्मक स्थिती वगळता) पोलिसांनी आरोपीला न्यायालयामध्ये नेतांना बेड्या घालू नये; परंतु याचे अभावानेच पालन होतांना दिसते.

५. झडती घेतांना घटनास्थळावरील व्यक्तींना पंच नेमणे अपेक्षित असतांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात जाऊन पंचनामा करणे

‘पोलिसांनी बंदीस्त जागा स्वाधीन असणार्‍या व्यक्तीच्या समक्ष झडती घ्यावी’, असे कायद्यामध्ये आहे; परंतु अनेक वेळा पोलीस त्याचे पालन करत नाहीत. झडती घेतांना अनेकदा पोलिसांचे वर्तन हुकूमशाहीचे असते. या वेळी पंचनामा करतांना अंमलदाराने २ पंच शक्यतो त्याच वस्तीतील उपस्थित ठेवावे. पोलिसांना बर्‍याच वेळा प्रत्यक्ष घटना पाहिलेले पंच मिळत नाहीत. (पंच राहिल्यास न्यायालयामध्ये वारंवार जावे लागते; म्हणून पोलिसांच्या भानगडीत पडण्याचे सर्वसामान्यांकडून टाळले जाते.) त्यामुळे काही पोलीस अंमलदार पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पंचनामा करतात आणि तेथेच पंचांच्या स्वाक्षर्‍या घेतात. (पोलीस अधिकारी किंवा अंमलदार यांनी त्रासदायकरित्या झडती घेणे, अटक करणे, कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता विनाकारण त्रासदायक पद्धतीने कह्यात घेणे आणि कोणत्याही व्यक्तीला त्रासदायकरित्या अन् विनाकारण अडकवून ठेवणे, हे मुंबई पोलीस कायदा १९५१ कलम १४७ प्रमाणे दोषास पात्र होऊ शकतो.)

६. ‘कायद्याचे सेवक आहोत’, याचे पोलिसांनी सदैव भान ठेवावे !

‘पोलीस हा जनतेचा सेवक असतो’, हे म्हणण्यापेक्षा ‘पोलीस हा कायद्याचा सेवक आहे’, हे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल. स्वत:च्या मर्जीप्रमाणे नव्हे, तर कायद्याने दिलेल्या अधिकारांनुसार त्याने कर्तव्य पार पाडावे. पोलीस हा विनम्र आणि कणखर असावा. त्याची वृत्ती सेवकाची असावी; पण गुलामाची नसावी. पोलिसाने सार्वजनिक उपयोगाचे काम करावे, तसेच समाजातील व्यक्तींसमवेत सदोदित शांतपणाने, सभ्यतेने आणि विचारपूर्वक वागावे. निष्ठा आणि निश्‍चय यांपासून त्याने ढळता कामा नये. त्याची कर्तव्याविषयीची निष्ठा अव्यभिचारी असली पाहिजे. थोडक्यात त्याच्या कर्तव्यात सचोटी आणि पारदर्शकता असली पाहिजे.

आदर्श पोलिसाची अनेक लक्षणे असली, तरीही जनता आणि पोलीस यांच्यात नेहमीच एक अदृश्य अंतर असण्याला कारण आहे, त्याच्या अंगावरची खाकी वर्दी ! पोलीस विभागामध्ये या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे काही पोलीस लबाड, धूर्त, कपटी, अप्रामाणिक, लाचखोर आणि आकसापोटी कारवाई करणारे दिसून येतात. अशा पोलिसांमुळेच संपूर्ण खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे.’

– एक निवृत्त पोलीस अधिकारी (१५.११.२०२०)

साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !

पोलीस आणि प्रशासनयांच्या संदर्भात येणारे कटू अनुभव कळवा !

पोलीस प्रशासन यांतील कर्मचारी किंवा अधिकारी यांच्याविषयी कटू अनुभव आले असल्यास ते पुढे दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत. या लेखाचे प्रयोजन ‘पोलीस आणि प्रशासन कसे नसावे’ हे ध्यानात यावे, संबंधित कर्मचारी/अधिकारी यांना त्यांच्या अयोग्य कृत्यांची जाणीव होऊन त्यांनी त्यात सुधारणा करावी आणि नागरिकांनी आपले राष्ट्रकर्तव्य म्हणून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता ते सुधारण्यास प्रयत्न करावेत, वेळप्रसंगी या विरोधात तक्रारी द्याव्यात, हे आहे.

पत्ता : अधिवक्ता नीलेश सांगोलकर

द्वारा सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा.

संपर्क क्रमांक : ९५९५९८४८४४

ई-मेल : [email protected]