आतंकवाद्यांच्या आक्रमणांना प्रत्युत्तर देण्याचा आम्हालाही अधिकार ! – भारत

भारताने असे केवळ बोलून न थांबता आतंकवाद्यांचा कारखाना असलेल्या पाकला नष्ट करावे, अशीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !

नागराज नायडू

न्यूयॉर्क (अमेरिका) – जिहादी आतंकवादी संघटनांनी एखाद्या देशाचा वापर करून आमच्या देशात आतंकवादी कारवाया केल्यास प्रतिबंधात्मक आणि सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून त्यांच्यावर आघात करण्याचा पर्याय आमच्यासमोर मोकळा असेल, अशी स्पष्ट आणि परखड भूमिका भारताने संयुक्त राष्ट्रांच्या एका अनौपचारिक बैठकीत मांडली.

संयुक्त राष्ट्रांतील भारताचे कायमस्वरूपी उपप्रतिनिधी के. नागराज नायडू यांनी ही भूमिका मांडली. या वेळी नायडू यांनी पाकिस्तानचे नाव घेतले नसले, तरी ते त्यालाच उद्देशून होते.
नायडू म्हणाले की, अमेरिकेत ११ सप्टेंबर २००१ या दिवशी झालेल्या आतंकवादी आक्रमणासारखी आक्रमणे टाळण्यासाठी संबंधित देशांपुढे स्वसंरक्षणाचा पर्याय खुला आहे, असे सुरक्षा परिषदेच्या ठरावांत म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र संसदेच्या ५१व्या कलमानुसार प्रत्येक देशास आतंकवादी संघटनांच्या आक्रमणास प्रत्युत्तर देण्याचाही अधिकार आहे.