जम्मू-काश्मीरमध्ये जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल बांधून सिद्ध !

नवी देहली – जम्मू-काश्मीरमध्ये जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल बांधण्यात आला आहे. हा रेल्वे पूल फ्रान्समधील आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच आहे. गेल्या ३ वर्षांपासून याचे काम चालू होते. चिनाब नदीवर इंद्रधनुष्याच्या आकाराच्या पुलाच्या बांधकामावर १ सहस्र २५० कोटी रुपये खर्च आला आहे. चिनाब नदीच्या तळापासून या पुलाची उंची ३५९ मीटर आहे.

या रेल्वे पुलावर रिक्टर स्केलवरील ८ तीव्रतेच्या भूकंपाचा, तसेच अतीतीव्रतेच्या स्फोटाचा काहीही परिणाम होणार नाही.

रेल्वे अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार संभाव्य आतंकवादी आक्रमणे आणि भूकंप यांच्यापासून बचावासाठी पुलामध्ये विशेष सुरक्षा प्रणाली असेल. पुलाची एकूण लांबी १ सहस्र ३१५ मीटर असणार आहे.