आपण खरोखर शिवप्रेमी आहात का ?

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील मनामनांत १९ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवरायांविषयीची पवित्र भावना जागृत झाली; परंतु या भावनांचा महापूर तात्पुरताच रहात असेल, तर यात पालट होणे अपेक्षित आहे. छत्रपतींच्या विचारांना आपल्या आचार-विचारांमध्ये कितपत स्थान आहे ? हे शिवरायांना मानणार्‍या प्रत्येकाने स्वत:मध्ये शोधायला हवे.

जसे की, हिंदूंच्या स्त्रिया, मंदिरे आणि शेती (संपत्ती) लुटण्यासाठीच असते, असा हीन विचार घेऊन आक्रमक वागणार्‍या प्रवृत्ती त्या काळी होत्या आणि आजही आहेत. अशा प्रवृत्तींच्या विरोधात बळ एकवटण्याचे कार्य छत्रपतींनी करून दाखवले. हिंदवी स्वराज्य स्थापनेचा मूळ पाया हाच होता, मग आज हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संकल्पनेची टर उडवून आपण काय साध्य करत आहोत ? हत्या आणि लूटमार यांचा रक्तरंजित इतिहास लिहिणारे अफझलखान आणि टिपू सुलतान यांसारख्यांचे उदात्तीकरण करून छत्रपतींनी रुजवलेल्या विचारांचे दमन करणे चालू आहे. तसे करण्याला हातभार लावून आपण खरोखर शिवरायांच्या विचारांचा आदर करतो का ? शिवरायांच्या फौजेत अमुक-तमुक होते, अशी नावांची सूची घोषित करत विशिष्ट जातीच्या विरोधात मत बनवणारा एक वर्ग सुसाट काम करत आहे.

शिवरायांना विशिष्ट जातीत बंदीस्त करण्याला आणि त्यांच्या हिंदवी स्वराज्याची प्रतारणा करत द्रोह माजवण्याला थांबवायचे कि चालू द्यायचे ? हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या अजरामर कार्यात मोलाची कामगिरी बजावणारे गडकोट, किल्ले यांसारखी ऐतिहासिक ठिकाणे आज मौजमजा, मेजवान्या करण्याचे, मद्यपान करण्याचे ठिकाण म्हणून वापरले जात आहे. त्या ठिकाणांवर ज्यांनी शौर्य गाजवले, त्यांचा हा सन्मान आहे का ? या अंगाने आपण काय करतो ? याची तपासणी स्वतःच करायला हवी. खासकरून अर्थ समजून न घेता सामाजिक माध्यमांवरील टीकेची पोस्ट ‘फॉरवर्ड’ करण्याची वाईट सवय जडलेल्या तथाकथित सुधारकांनी हे पालट स्वतःमध्ये करून घेणे अपेक्षित आहे. जर आपण खरे शिवप्रेमी असू, तर यावर विचार करावा. विष पेरणार्‍यांना थारा देणे बंद करून छत्रपती शिवरायांचा सन्मान करूया !

– श्री. योगेंद्र जोशी, नंदुरबार