एखाद्या राजासारखे वागू नका ! – पंतप्रधान मोदी यांचा भाजपच्या नेत्यांना सल्ला

नवी देहली – एखाद्या राजासारखे वागू नका. भूमीशी नाते असणारा नेता व्हा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या नेत्यांना दिला आहे, अशी माहिती पक्षाच्या नेत्याने दिली. ‘सत्ता मिळवणे हा पक्षाचा मुख्य हेतू नसून लोकसेवा हा हेतू आहे’, असेही ते म्हणाले. ते पक्षाच्या नेत्यांना मार्गदर्शन करत होते.

पंतप्रधान मोदी यांनी पुढे म्हटले की, सर्व नेत्यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी अहंकाराने वागू नये. या कार्यकर्त्यांनीच तुम्हाला नेता बनवले आहे. पक्षाच्या नेत्यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी उद्धट वर्तन करू नये. तसेच या कार्यकर्त्यांना वरचेवर भेटावे ज्यामुळे एकप्रकारचा सकारात्मक संदेश त्यांच्यात जातो. नेत्यांनी स्वतःच्या कार्यालयांमध्ये बसून राहू नये. त्याऐवजी रस्त्यावर उतरून थेट कार्यकर्त्यांशी, जनतेशी अधिकाधिक संवाद साधावा. सर्व नेत्यांनी अधिक नम्र, सर्वसमावेशक आणि कधीही संपर्क होऊ शकतो अशापद्धतीची व्यवस्था निर्माण करावी, असा सल्ला दिला.