परात्पर गुरुदेवांवरील दृढ श्रद्धेच्या बळावर अत्यंत कठीण प्रसंगाला सामोरे जाणार्‍या साधिका !

कालच्या लेखात साधिकेचा ताप न्यून न झाल्याने कुटुंबियांनी रुग्णालयात भरती करण्याचा निर्णय घेणे, शेजार्‍यांनी साहाय्य करणे, गुरुदेवांनी साधिकेची रुग्णालयातही व्यष्टी साधना करवून घेणे, रुग्णालयात असतांना साधिकेने भावाच्या स्तरावर केलेले प्रयत्न आणि रुग्णालयातही साधिकेकडून गुरुदेवांनी सेवा करवून घेणे याविषयीचा भाग पाहिला. आज लेखाचा अंतिम भाग देत आहोत.

मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/453221.html


परात्पर गुरु डॉ. आठवले

४. इंजेक्शनमुळे पोटात रखरख झाल्यास गुरुदेवांचे मानस चरणतीर्थ घेणे

गुरुदेव मला सर्व व्यवस्थित देत असत. मला अनेक इंजेक्शने दिल्याने पोटात पुष्कळ रखरख व्हायची. गुरुदेवांच्या मानस चरणतीर्थाची बाटली घेऊन ठेवली होती. मी त्यातील एकेक घोट तीर्थ घेत होतेे. त्यात तुळशीची पाने, गुलाबाच्या पाकळ्या, गंगामातेचे चरणतीर्थ, दैवी अत्तर आणि कापूर, गोमूत्र असे सर्व मिसळलेले पवित्र चरणतीर्थ गुरुदेव मला देत असत. मी दिवसातून ४ – ५ वेळा ते तीर्थ घ्यायचे.

५. नामवंत रुग्णालयाविषयी लक्षात आलेली सूत्रे

५ अ. जेवण चांगले असायचे.

५ आ. रुग्णालयाचा कर्मचारी वर्ग शिकाऊ असल्याने त्यांनी रुग्णांकडे एखादे यंत्र म्हणून पहाणे आणि सलाईनची सुई टोचण्याचे ज्ञान कुणालाही नसल्याने शिरेतून रक्त बाहेर येऊन हात ठसठसणे : या रुग्णालयाचा कर्मचारी वर्ग (स्टाफ सिस्टर, ब्रदर) शिकाऊ होता. त्यांच्यावर कामाचा पुष्कळ भार असायचा. त्यांच्यात जराही प्रेमभाव नव्हता. ते एकमेकांत सतत भांडायचे. १२ वेळा घंटा वाजवूनही परिचारिका लवकर यायची नाही. रुग्णाने सकाळी १२ वाजता पाण्याची बाटली मागितली, तर ती संध्याकाळी ५ वाजता मिळत असे. हातात सलाईनची सुई टोचण्याची माहिती कुणालाच नव्हती. सुई टोचल्यावर शिरेतून रक्त बाहेर यायचे. माझा हात ठसठसत सुजायचा, तरी परिचारिका एखाद्या यंत्रणेवर सुया खुपसल्यासारखे करायचे.

५ इ. भुकेने डोळ्यांतून पाणी येणे, त्या वेळी गुरुदेवांनी सहनशक्ती देणे : दुपारी २ वाजता आलेला जेवणाचा डबा ३ वाजता हातात यायचा. तेव्हा भुकेने माझ्या डोळ्यांतून घळघळ पाणी यायचे. त्या वेळी गुरुदेव मला सहनशक्ती द्यायचे. मी घोटभर चरणतीर्थ घ्यायचे. मी सात्त्विक उदबत्तीने अन्नाची मानस शुद्धी करायचे. मी अन्नपूर्णादेवीला प्रार्थना करायचे. तेव्हा अन्नपूर्णादेवीचे संरक्षककवच अन्नाभोवती निर्माण व्हायचे. मी गुरुदेवांना कृतज्ञता व्यक्त करून त्यांना प्रतिदिन शबरीची पोळी, उपीट, इडली खायला येण्यासाठी प्रार्थना करायचे. ‘गुरुदेवांनी खाल्याविना खायचे नाही’, असा मी भावप्रयोग करायचे.

५ ई. रक्त घेण्यासाठी आल्यानंतर येतांना स्पिरीट आणि कापूस न आणणे अन् रक्ताची धार लागल्यावर त्यांनी त्यावर ‘सॅनिटायजर’ ओतणे आणि असे एकेक प्रसंग घडतांना कर्मचारी वर्गाकडे पहाणारे तिथे कुणीच नसणे : एक दिवस माझे रक्त घेण्यासाठी एक व्यक्ती (ब्रदर) आली होती. त्यांनी स्पिरिट आणि कापूस आणले नाही. माझ्या हातातून रक्त घेतल्यानंतर वर लावायला कापूस नव्हता. माझ्या हाताला रक्ताची धार लागल्यावर त्यांनी त्यावर सॅनिटायजर ओतले. असे एकेक प्रसंग घडत होते. कर्मचारी वर्गाकडे पहाण्यासाठी तिथे कुणीच नसायचे. मला शेवटच्या दिवशी घरी सोडणार, त्या दिवशी मी दिवसभर सर्वांना सांगायचे, ‘‘माझ्या डाव्या हाताची सलाईनची सुई काढा. हात खूप दुखत आहे. हलवता येत नाही.’’ माझा हात सुजला होता; परंतु कुणीही माझ्याकडे लक्ष देत नव्हते.

५ उ. सलाइनची सुई काढायला सांगितल्यावर एका कर्मचार्‍याने पैसे भरल्याविना सुई काढणार नसल्याचे सांगणे आणि पैसे भरल्याची प्रकिया संध्याकाळी ५ वाजता संपल्यावरच सलाईनची सुई काढणे : एका कर्मचार्‍याने सांगितले पैसे भरल्याविना सुई काढणार नाहीत. सकाळी ११ वाजल्यापासून चालू झालेली प्रक्रिया संध्याकाळी ५ वाजता मी पैसे भरल्यावर संपली. तेव्हा कर्मचार्‍यांनी माझ्या हाताची सुई काढली. माझ्या हातातून रक्त यायला लागल्यावर तेथे भराभर स्पिरिट लावलेला कापूस फिरवला आणि मला चाकाच्या आसंदीतून खाली रुग्णवाहिकेपर्यंत आणून सोडले. २०.६.२०२० या दिवशी मी घरी आले.

५ ऊ. नातेवाईक किंवा अन्य कुणालाही रुग्णाला भेटू न देणे आणि भ्रमणभाषवर केवळ ३ मिनिटे बोलायला देणे : या दहा दिवसांत रुग्णाला नातेवाईक किंवा अन्य कुणालाही भेटू देत नव्हते. कर्मचारी नातेवाईकांशी बोलण्यासाठी ३ मिनिटांसाठी भ्रमणभाष लावून द्यायचे आणि तेवढा वेळच बोलायचे. ते कुणाकडेही भ्रमणभाष ठेवायचे नाहीत. रुग्ण ‘व्हिडिओ’ काढून अन्यत्र पाठवतात; म्हणून सर्वांचे भ्रमणभाष जप्त केले होते.

५ ए. ताप असल्याने अशक्तपणा येऊन आणि इंजेक्शन घेतल्याने उभे राहून चालता न येणे, घड्याळ मुख्य सभागृहात असल्याने वाजले किती हे न समजणे; परंतु गुरुदेवांनी शक्ती दिल्याने बाहेर जाऊन वेळ बघता येणे : कर्मचारी वर्ग २५ ते ३० वर्षांचे तरुण होते. सर्व जण कोरोना पोशाखा (ड्रेस)मधे असायचे. कोणत्याही खोलीत घड्याळ नाही. घड्याळ बघण्यासाठी मुख्य सभागृहात जाऊन बघावे लागे. ‘डायबेटिस’चे निदान झाल्याने मला सर्व वेळेत घ्यावे लागे. कर्मचार्‍यांना विचारले, तर ते सरळ सांगायचे, ‘‘किती वाजले ते ठाऊक नाही.’’ मला ताप असल्याने अशक्तपणा असायचा आणि इंजेक्शन घेतल्याने मला चालता यायचे नाही. मला सतत बाहेर जाऊन वेळ बघावी लागायची. तेव्हा गुरुदेवच मला घेऊन जायचे. कामवाल्या मावश्या किंवा शौचालय स्वच्छ करणारी मुले पाण्याच्या बाटल्या किंवा जेवणाचे खोके आणून द्यायचे. कुणीही स्वच्छता पाळत नव्हते.

६. ‘गुरुदेवांच्या हिंदु राष्ट्रात सात्त्विक रुग्णालये असतील’, असा विचार येऊन पुष्कळ कृतज्ञता वाटणे

माझ्या गुरुदेवांच्या हिंदु राष्ट्रातील रुग्णालये कशी असतील ? ‘साधक आधुनिक वैद्य असतील. ते रुग्णांना किती जपतील. त्यांच्यात किती प्रेमभाव असेल. सर्व जण एकमेकांना विचारून सेवा करतील. वातावरणही सात्त्विक असेल. सगळीकडे भजनांचा नाद ऐकू येईल आणि सर्वत्र देवतांची छायाचित्रे असतील. सर्वत्र परम पूज्य देवाचे अस्तित्व’, असे विचार येऊन माझ्या डोळ्यांसमोर चित्र उभे रहायचे. ‘हिंदु राष्ट्रातील रुग्णवाहिकेवर देवतांचे चित्र आणि आत भजने, पोवाडे, भावगीते, भक्तीगीते लावलेली असतील’, असे चित्र मला दिसायचे. ‘सर्वत्र सात्त्विक रुग्णालये असतील’, याविषयी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

७. कुटुंबियांनाही ताण आणि त्रास होऊन प्रतिदिन नवीन अडचणींना सामोरे जावे लागणे, गुरुदेवांनी कुटुंबियांकडे लक्ष देऊन त्यांचीही काळजी घेणे

मुलगा आणि यजमान यांना माझ्याकडे आणि घराकडे लक्ष द्यावे लागायचे. त्यांना ताण येऊन त्रास व्हायचा. त्यांना प्रतिदिन नवीन अडचणींना सामोरे जावे लागायचे. गुरुदेवांनी कुटुंबियांचीही काळजी घेतली. घरातून रुग्णालयात ज्या वस्तू यायच्या, त्या सर्व नवीन असायच्या; कारण सलाईन लावलेल्या हातातून कपडे जायचे नाहीत. मला यजमानांचे जुने शर्ट घालायला लागायचे. त्यांनी स्पंजिंग करण्याचे साहित्य पाठवल्याने मला ते बरे पडत असे. वेणी आणि अंघोळ पंधरा दिवस तशी नव्हती; पण गुरुदेवांनी पुष्कळ काळजी घेतली. यजमान आणि मुलगा यांनी माझी घरी वेगळ्या खोलीत दहा दिवस रहाण्याची सर्व सिद्धता करून ठेवली होती. यजमान मला पिण्याच्या गरम पाण्यापासून ते फळे, सुका मेवा, जेवणाचा डबा, चहा, दूध, काढा आणि औषधे आनंदाने देत होते.

८. सकाळच्या वेळी कुटुंबीय प्रतिदिन मानसरित्या रामनाथी आश्रमात गुरुदेवांच्या चरणांची पाद्यपूजा करण्यासाठी जाणे

आमचा सकाळचा प्रारंभ प.पू. गुरुमाऊलीची पाद्यपूजा करून होत असे. सकाळच्या वेळी आम्ही कुटुंबातील ५ जण (यजमान, मुलगा, सून, नात आणि मी) प्रतिदिन मानसरित्या रामनाथी आश्रमात गुरुदेवांच्या चरणांची पाद्यपूजा करण्यासाठी जायचो.

९. आलेल्या अनुभूती

९ अ. ‘ऑक्सिजन लावल्यावर प्राणवायू मिळू दे’, अशी गणपतीला प्रार्थना होणे आणि मग ऑक्सिजनच्या सिलिंडरच्या जागी केशरी अन् गुलाबी प्रकाश दिसणे : मला ५ दिवस ऑक्सिजन लावला होता. तेव्हा ‘गणराया मला प्राणवायू मिळू दे’, अशी माझ्याकडून सतत प्रार्थना व्हायला लागली. गुरुदेव माझ्याकडून अशा प्रार्थना करवून घ्यायचे आणि मग त्या ऑक्सिजनच्या सिलिंडरच्या जागी मला केशरी अन् गुलाबी प्रकाश दिसायचा. माझी प्रत्येक क्षणी सतत कृतज्ञता व्यक्त व्हायची. गुरुदेवच हे सर्व करवून घ्यायचे.

९ आ. ‘मारुतिराया हातात गदा घेऊन माझे रक्षण करत आहे. देवता माझ्या सभोवती उभ्या असून माझे रक्षण करत आहेत. सर्वत्र पिवळे चैतन्याचे वलय आहे’, असे मला दिसत असे.

९ इ. दिवसभरात ९ इंजेक्शने दिल्याने अंगाची लाही लाही होऊन अस्वस्थता येत असल्याने दिवस-रात्र झोप न लागणे आणि गुरुदेवांचा हात पाठीवरून फिरत असल्याचे जाणवून त्यातून चैतन्य मिळणे अन् सतत गुरुदेवांचे अस्तित्व जाणवणे : इंजेक्शनच्या मार्‍यामुळे (दिवसभरात ९ इंजेक्शने) माझ्या अंगाची लाही लाही होऊन मला अस्वस्थता यायची. मला दिवस-रात्र झोप लागत नसे. तेव्हा ‘गुरुदेव मला लहान बाळासारखे मांडीवर घेऊन झोपवत आहेत. मी त्यांचे लहान बाळ झाले आहे. ते कधी मला कडेवर घेऊन खोलीतल्या खोलीत फिरवायचे, तर कधी पाठीवर थोपटायचे. त्यांचा हात माझ्या पाठीवरून फिरत आहे. त्यातून मला चैतन्य मिळत आहे’, असे मला दिसायचे. मला सतत गुरुदेवांचे अस्तित्व जाणवायचे.

१०. कृतज्ञता

माझी काहीही क्षमता नसतांना गुरुमाऊलींनी मला यातून वाचवून माझी अंतर्बाह्य शुद्धी करून समष्टीचा आनंद देऊन त्यांच्या चरणांजवळ ठेवले. त्यांनी मला पुनर्जन्म दिला. मी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’

(समाप्त)

– गुरुदेवांच्याच चरणांवरचे एक फूल,एक साधिका

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक