१. ताप न्यून न झाल्याने कुटुंबियांनी रुग्णालयात भरती करण्याचा निर्णय घेणे
‘३.६.२०२० या दिवसापासून मला ताप येऊ लागला. मला ताप १००, १०१ डिग्री असायचा. माझा ताप उतरत नव्हता. माझ्यावर औषधांचा मारा चालूच होता. मला ‘फ्लू’ झाला होता. मी ७ दिवस तापाने रुग्णाइत होते. कुटुंबियांनी मला रुग्णालयात भरती करण्याचा निर्णय घेतला. ११.६.२०२० या दिवशी मला एका रुग्णालयात भरती केले.
२. शेजार्यांनी साहाय्य करणे
मला ताप असतांना शेजारच्या काकू मला सकाळी आणि दुपारी पेज अन् गरम उकड देत होत्या. तेव्हा माझी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त व्हायची.
३. रुग्णालयात भरती होणे
३ अ. रुग्णालयात गेल्यावर हाताला ‘सलाईन’ टोचून ‘अॅडमिशन फॉर्म’ भरून घेणे आणि तिथूनच खर्या लढ्याला प्रारंभ होणे, ‘ग्लानी, अंगदुखी, अस्वस्थता, रात्रभर झोप न येणे’, हे सर्व चालू असणे अन् गुरुदेव सतत समवेत असल्याची जाणीव होणे : मला रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात गेल्यावर तेथे पहिली सर्व प्रक्रिया होऊन माझ्या हाताला सलाईन टोचूनच माझा ‘अॅडमिशन फॉर्म’ भरून घेतला. तिथूनच माझ्या खर्या लढ्याला प्रारंभ झाला. मला प्रत्येक क्षणी नवीन दुखणे असायचे. मला प्रतिदिन ९ इंजेक्शने, औषधे, गोळ्या सर्व चालू झाले. माझे ‘सीटीस्कॅन’ करण्यात आले. माझ्या सतत वेगवेगळ्या रक्त तपासण्या, कोरोना चाचणी चालू होती. माझा ‘कोरोना’ चाचणी अहवाल सकारात्मक आला. मला प्राणवायू (ऑक्सिजन) न्यून पडत होता. मला ५ दिवस प्राणवायू दिला. मला काही कळत नव्हते. मला ग्लानी आणि अंगदुखी असायची. मला रात्रभर झोप यायची नाही. तेव्हा ‘माझे गुरुदेव सतत समवेत आहेत’, असे मला जाणवायचे.
३ आ. गुरुदेवांनी रुग्णालयातही व्यष्टी साधना करवून घेणे
३ आ १. व्यष्टी साधनेचा आढावा मानसरित्या भिंतीवर लिहून तो गुरुदेवांना सांगणे : माझ्या गुरुमाऊलीची लीला अगाध आहे. मला या सर्वांतून केवळ गुरुदेवांनीच बाहेर काढले. गुरुदेव माझ्याकडून रुग्णालयात ६ घंटे नामजप आणि व्यष्टी साधनेची सर्व सूत्रे पूर्ण करून घेत होते. प्रतिदिन रात्री झोपतांना गुरुदेव माझ्याकडून भिंतीवर व्यष्टी साधनेचा आढावा मानसरित्या लिहून घ्यायचे आणि नंतर मी आढावा गुरुदेवांना सांगायचे. माझ्याकडून रात्रीपर्यंत ठरवलेली स्वयंसूचना सत्रांची संख्या पूर्ण झाली नाही, तर ती पूर्ण करून मग मी झोपायचे. माझ्याकडून चूक झाल्यास प्रायश्चित्त म्हणून एक सत्र अधिक करायचे.
३ आ २. रामनाथी आश्रमात प.पू. गुरुमाऊलीसमोर व्यष्टी साधनेचा आढावा द्यायला मानसरित्या जाणे आणि ‘सर्वांच्या मनाचा अभ्यास अन् मन निर्मळ होण्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजेत ?’, हे गुरुदेवांनी सांगणे : मी व्यष्टी साधना करतांना वेगवेगळे भावप्रयोग करायचे. मी प्रतिदिन सहसाधकांना घेऊन रामनाथी आश्रमात साक्षात् प.पू. गुरुमाऊलीसमोर व्यष्टी साधनेचा आढावा द्यायला जायचे. काही वेळा मी रामनाथी आश्रमात मारुतिरायांकडून साधकांची मानस दृष्ट काढून घ्यायचे. प.पू. गुरुदेव आम्हा साधकांना न्यायला कधी पुष्पक विमान, तर कधी सोनेरी धर्मरथ पाठवायचे. आम्ही सर्व जण त्यात बसून रामनाथी आश्रमात जायचो आणि गुरुदेवांना व्यष्टी साधनेचा आढावा सांगायचो. व्यष्टी साधनेच्या आढाव्यात वेगवेगळे विषय असायचे. साधक गुरुमाऊलींना चुका, मनाची स्थिती, प्रायश्चित्त घेणे आणि पुन्हा काय प्रयत्न करणार यावर चर्चा, उद्याचा अभ्यास, यांविषयीची सूत्रे सांगायचे, तर साधक कधी गुरुमाऊलींच्या चरणांवर कृतज्ञतारूपी पुष्पे अर्पण करायचे. गुरुदेव ‘मनाचा अभ्यास आणि मन निर्मळ होण्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजेत ?’, याविषयी सांगायचे.
३ इ. रुग्णालयात असतांना भावाच्या स्तरावर केलेले प्रयत्न
३ इ १. हात पुष्कळ दुखत असणे आणि ‘सूज न्यून होईल’, असे वाटल्याने ‘हिमालयाच्या पर्वतावर हात ठेवला आहे’, असा भाव ठेवून झोपणे, सलाईनच्या बाटलीप्रमाणे इंजेक्शन पाहून ‘भगवान दत्तात्रेय आणि शिव यांचा कमंडलू असून तेच त्यातून शरिरात चैतन्य पाठवत असून ‘सलाईन अडकवायची काठी, म्हणजे प.पू. भक्तराज महाराज यांची काठी आहे’, असा भाव ठेवण्यास गुरुदेवांनी सांगणे : गुरुदेव, माझ्याकडून भावाच्या स्तरावर प्रयत्न करून घ्यायचे आणि मला दिवसभर भावावस्थेत ठेवायचे. मला सलाईन देण्यासाठी हातात सुई टोचलेली असल्याने माझा हात पुष्कळ दुखायचा. मला हात सरळ करता यायचा नाही. मी गुरुदेवांना शरण जाऊन कळवळून सांगायचे, ‘गुरुदेवा, माझा हात पुष्कळ दुखत आहे.’ मी बर्फाच्या पट्टीवर हात ठेवला, तर सूज न्यून होईल; म्हणून परिचारिकेकडे बर्फाची पट्टी मागायचे. एकदा त्यांनी मला बर्फाची पट्टी दिली; मात्र दुसर्या दिवशी दिली नाही. तेव्हा ‘हिमालयाच्या पर्वतावर हात ठेवला आहे’, असा भाव ठेवून मी झोपी जायचे. सलाईनच्या बाटलीसारखे ‘इंजेक्शन’ पाहून गुरुदेव मला ‘ते ‘इंजेक्शन’ म्हणजे भगवान दत्तात्रेय आणि शिव यांचा कमंडलू असून तेच कमंडलूमधून चैतन्य माझ्या शरिरात पाठवत आहेत अन् सलाईन अडकवायची काठी (स्टँड), म्हणजे प.पू. बाबांची काठी आहे’, असा भाव ठेवायला सांगायचे.
३ इ २. ‘गुरुदेव माझ्या समवेत असून त्यांच्या खोलीत चरणांजवळ गोळा म्हणून पडून राहिले आहे’, असा भाव ठेवणे : नंतर मला दुसर्या खोलीत नेण्यात आले. तिथे एक आधुनिक वैद्या रुग्ण म्हणून होती. ती सतत रडत असे. ‘मला इथून लवकरात लवकर बाहेर जायचे आहे’, असे ती आधुनिक वैद्या परिचारिकेला सांगत असे. असे सर्व बोलणे असायचे. तेव्हा ‘गुरुदेवांनी मला मायेपासून लांब ठेवले’, यासाठी माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली. गुरुदेव, मला रुग्णालयात कुणाचीच आठवण यायची नाही. ‘गुरुदेव माझ्या समवेत असून मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत त्यांच्या चरणांजवळ गोळा म्हणून पडून राहिले आहे’, असा भाव ठेवला होता.
३ ई. रुग्णालयातही गुरुदेवांनी सेवा करवून घेणे
३ ई १. गुरुदेवांनी रुग्णांना साधना, जप आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगण्याची सेवा करवून घेणे : अन्य रुग्ण पुष्कळ रडायचे. कुणाला यजमान, कुणाला मुले, तर कुणाला आई-वडील यांची आठवण येत असे. रुग्णालयातील रुग्ण पुष्कळ घाबरलेले होते. काही रुग्णांना भीती वाटायची. काही रुग्णांना दम लागायचा. गुरुदेवांनी माझ्याकडून या सर्वांना साधना, जप आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगण्याची सेवा करवून घेतली. त्यामुळे त्यांना पुष्कळ धीर यायचा. ‘एका रुग्णाने तर लगेच ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू केला. त्या पुष्कळ घाबरल्या होत्या. सकाळी आधुनिक वैद्य आले की, या खोलीतल्या रुग्णाला दुसर्या खोलीत हलवत आणि तिकडचा रुग्ण या खोलीत आणत असत. प्रत्येक पलंगाला चाके होती. त्यामुळे रुग्णांना चाकाच्या पलंगावरून इकडून तिकडे नेऊन ठेवत असत. गुरुदेव, माझी एका रुग्णाला साधना सांगून झाल्यावर तिकडच्या दुसर्या स्त्री रुग्णाला माझ्या खोलीत पाठवत. मला त्यांना साधना, नामजप आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगायची संधी मिळायची. अशा प्रकारे गुरुदेव माझ्याकडून त्या वेळेतही सेवा करवून घ्यायचे. मी काम करणार्या मावशींनाही (आयांनाही) नामजप आणि गुरुपौर्णिमा यांचे महत्त्व सांगायचे.
३ ई २. मानसरित्या प्रतिदिन २ नातेवाइकांना भ्रमणभाष करून त्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व, साधना, नामजप आणि अर्पण यांचे महत्त्व सांगितले जाणे अन् ‘येणार्या आपत्काळात साधना कशी करायची ?’, याची गुरुदेव आताच मानस सिद्धता करून घेत असल्याचे जाणवणे : ‘प्रतिमा जोपासणे’ या अहंच्या पैलूंवर मात करण्यासाठी मी मानसरित्या प्रतिदिन २ नातेवाइकांना भ्रमणभाष करून त्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व, साधना, नामजप आणि अर्पण यांचे महत्त्व अन् ‘ते अर्पण कसे भरू शकतो ?’, हे सांगायचे. ऑनलाईन सत्संग असायचा. त्यामध्ये मी ‘परम पूज्यांचे महत्त्व, गुरुपौर्णिमेचे महत्त्व आणि गुरुकृपायोगानुसार साधना, काळानुसार साधना, वर्णानुसार साधना, स्थुलातून सूक्ष्मात जाणे, अनेकातून एकात येणे, देवघराची मांडणी, दत्त, कुलदेवीचा जप, गुरुपौर्णिमा अर्पण, सत्पात्रे दान’ यांविषयी सांगायचे. गुरुदेवा, प्रत्येक सत्संगात १२, १५, २५ अशी उपस्थिती असायची. ‘येणार्या आपत्काळात साधना कशी करायची ?’, याविषयी गुरुदेव माझ्याकडून आताच मानस सिद्धता करून घेत असल्याचे जाणवले. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
३ ई ३. गुरुदेव अंतर्बाह्य शुद्धी करवून घेत असल्याचे जाणवून कृतज्ञता व्यक्त होणे : एकदा एका वसाहतीत मी आणि सहसाधिका मानसरित्या गुरुपौर्णिमा अन् अर्पण यांचे महत्त्व, दत्त आणि कुलदेवी यांचा जप सांगायला अन् सत्संग घ्यायला गेलो होतो. मी तिथेही कर्तेपणा स्वतःकडे घेतला. ‘सहसाधिकेला तुम्ही काही भाग सांगा’, असे मी सांगितले नाही. तेव्हा गुरुदेवांनी ‘कर्तेपणा घेणे, इतरांचा विचार न्यून असणे’ या स्वभावदोषांची मला आठवण करून दिली. ‘गुरुदेव माझी अखंड अंतर्बाह्य शुद्धी करवून घेत आहेत’, असे जाणवून माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त व्हायची.
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– गुरुदेवांच्याच चरणांवरचे एक फूल, एक साधिका
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
अंतिम भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! : https://sanatanprabhat.org/marathi/453497.html