परात्पर गुरु डॉ. आठवले पाणी घालत असलेल्या तुळशींमधून वातावरणात चैतन्य प्रक्षेपित होणे

वनस्पतींविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

सौ. मधुरा कर्वे

‘हिंदु धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार्‍या महर्षींनी रामतुळस आणि कृष्णतुळस यांची रोपे एकत्रितपणे रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाच्या परिसरात लावायला सांगितली होती. त्यानुसार १६.५.२०१७ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी रामतुळशीचे रोप आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कृष्णतुळशीचे रोप यांचे दोन कुंड्यांत विधीवत् रोपण केले. २७.५.२०१७ या दिवसापासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रतिदिन सकाळी स्नान केल्यानंतर या तुळशींना पाणी घालून प्रदक्षिणा घालायला प्रारंभ केला. तेव्हापासून आजपर्यंत रामतुळस आणि कृष्णतुळस यांच्या संदर्भात ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे विपुल संशोधन करण्यात आले आहे. वर्ष २०१८ मध्ये या तुळशींच्या संदर्भात केलेले संशोधन पुढे दिले आहे.

रामतुळस आणि कृष्णतुळस यांच्यातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी १७.८.२०१८ या दिवशी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे दोन्ही तुळशींच्या चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

१. चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन

१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्‍लेषण : परात्पर गुरु डॉ. आठवले पाणी घालत असलेल्या दोन्ही तुळशींमधून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : परात्पर गुरु डॉ. आठवले पाणी घालत असलेल्या दोन्ही तुळशींमध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसून सकारात्मक ऊर्जा आहे. रामतुळशीपेक्षा कृष्णतुळशीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ०.४३ मीटरने अधिक आहे. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

२ अ. तुळशीचे महत्त्व : तुळशीत श्रीविष्णुतत्त्व असते. तुळस सदैव देवतेचे तत्त्व प्रक्षेपित करत असल्यामुळे ती सभोवतालचे वातावरण शुद्ध आणि पवित्र करते. (‘तुळशीचे झाड २४ घंटे प्राणवायू सोडते’, असे विज्ञानही सांगते.) वातावरणातील रज-तमाचा परिणाम प्रत्येक वस्तूवर होत असतो. तुळशीतून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक स्पंदनांमुळे वातावरणातील रज-तम नष्ट होते. थोडक्यात, तुळस ही सात्त्विक वनस्पती असून तिच्यामुळे वातावरणाची सतत शुद्धी होते. त्यामुळे पूर्वी घराघरांत प्रवेशद्वारापाशी ‘तुळशी वृंदावन’ असायचे. घरातील स्त्रिया भक्तीभावाने तुळशीचे पूजन करून तिला नमस्कार अन् प्रार्थना करत. तसेच सायंकाळी तुळशीसमोर दिवा लावत. आजच्या विज्ञानयुगातही ग्रामीण भागात ही परंपरा जोपासली जाते.

कृष्ण तुळस आणि राम तुळस

२ आ. महर्षींनी रामतुळस आणि कृष्णतुळस यांची रोपे लावण्यास सांगण्यामागील कारण : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये रामतत्त्व, तसेच कृष्णतत्त्वही आहे’, असे महर्षींनी सांगितले आहे. ‘राम आणि कृष्ण या दोन्ही तत्त्वांचा सनातनच्या साधकांना लाभ व्हावा, तसेच श्रीकृष्ण अन् श्रीराम या दोन्ही अवतारांचा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला आशीर्वाद मिळावा’, यासाठी महर्षींनी रामतुळस आणि कृष्णतुळस यांची रोपे विधीवत् कुंडीत लावण्यास सांगितली होती. ‘धर्मसंस्थापनेसाठी कृष्णतुळस आणि त्यानंतर रामराज्य येण्यासाठी रामतुळस लावण्यास सांगितली आहे’, असाही महर्षींचा त्यामागचा हेतू आहे.

२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले पाणी घालत असलेल्या दोन्ही तुळशींमधून वातावरणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : परात्पर गुरु डॉ. आठवले प्रतिदिन सकाळी स्नान केल्यानंतर या तुळशींना पाणी घालून प्रदक्षिणा घालतात. परात्पर गुरु डॉक्टर ही कृती अत्यंत भावपूर्ण करतात. परात्पर गुरु डॉक्टरांनी केलेल्या भावपूर्ण अर्चनेमुळे (पूजा केल्यामुळे) तुळशीतील देवतातत्त्व जागृत होऊन कार्यरत झाले. त्यामुळे तुळशींमधून वातावरणात चैतन्य प्रक्षेपित झाले.

२ ई. रामतुळशीपेक्षा कृष्णतुळशीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अधिक असणे : रामतुळशीपेक्षा कृष्णतुळशीमध्ये अधिक चैतन्य असल्याने तिच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अधिक आहे. दोन्ही तुळशींचे सूक्ष्म परीक्षण करतांना श्री. राम होनप यांना ‘कृष्ण’ तुळशीतील चैतन्य ‘राम’ तुळशीतील चैतन्याच्या तुलनेत अधिक असल्याचे जाणवले. याविषयी परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘कृष्णतत्त्वाचे कार्य काळानुरूप अधिक असल्याने असे होते. सूक्ष्मातील प्रयोगांना अंत नाही. आताच्या प्रयोगांत असे जाणवते; पण हिंदु राष्ट्रात रामतत्त्वाचे कार्य अधिक असेल, तेव्हा परत तुळशीचा प्रयोग करायचा.’’ (वर्ष २०२० मध्ये केलेल्या चाचण्यांतून कृष्णतुळशीपेक्षा रामतुळशीमध्ये सकारात्मक स्पंदने अधिक असल्याचे दिसून येत आहे. – संकलक)

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२८.११.२०२०)

ई-मेल : [email protected]