सामाजिक प्रसारमाध्यमांवर आत्महत्येची पोस्ट प्रसारित करणार्‍या युवकांचे समुपदेशन करून पोलिसांनी प्राण वाचवले

विज्ञानाने कितीही प्रगती केली, तरी समाजातील आत्महत्येचे प्रमाण विज्ञानाला रोखता आलेले नाही. समाजातील ताणतणाव आणि गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यावर ‘साधना’ हाच एकमात्र उपाय आहे. साधना केल्यामुळे नैराश्याचे विचार दूर होऊन मन सकारात्मक होते. अध्यात्माचे हे महत्त्व लक्षात घेऊन समाजातील प्रत्येकाने साधना करणे अत्यावश्यक आहे.

मुंबई –  सामाजिक प्रसारमाध्यमांवर आत्महत्येची पोस्ट प्रसारित करणार्‍या युवकांचे समुपदेशन करून पोलिसांनी त्यांचे प्राण वाचवले. यांतील एका युवकाला अभ्यासाचा ताण आला होता, तर एक युवक सावत्र आईच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणार होता, अशी माहिती सायबर सेलचे पोलीस अधिकारी डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देतांना डॉ. रश्मी करंदीकर म्हणाल्या, ‘‘१६ फेब्रुवारीला रात्री ९.३० वाजता एका व्यक्तीने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये दूरभाष करून एका मुलाने फेसबूकवर आत्महत्या करणार असल्याचे लिखाण केले असल्याचे सांगितले. पोलिसांनी ही माहिती त्वरित सायबर सेलकडे दिली. सायबर पोलिसांनी ‘फेसबूक’चे साहाय्य घेऊन त्या मुलाचे ठिकाण शोधले. हा मुलगा मालाड येथील असल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्या मुलाचे समुपदेशन केले. या मुलाचे वय २१ वर्षे असून सावत्र आईच्या त्रासामुळे त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते.

अन्य एका प्रसंगात मुंबई पोलिसांनी ‘ट्विटर’ वर एका मुलाच्या आत्महत्येची पोस्ट पाहिली. ‘ट्विटर’ कडून या मुलाचे ठिकाण संभाजीनगर असल्याचे समजले. यानंतर तात्काळ मी तेथील जिल्हा पोलीस अधीक्षकांना माहिती दिली. पोलिसांनी त्वरित त्या ठिकाणी जाऊन मुलाचे समुपदेशन केले. हा मुलगा १२ वीत शिकत असून त्याला अभ्यासाची भीती वाटत असल्याचे त्याने सांगितले.’’