स्वतःला आणि इतरांना कुंकू अन् विभूती लावण्याची पद्धत आणि तिच्यामागील शास्त्र !

१. कुंकू लावण्याचे ठिकाण

‘कुंकू भुवयांच्या मध्यापासून अर्धा सें.मी. वर लावावे.

२. स्त्री-पुरुषांचा कुंकवाचा आकार

२ अ. स्त्रियांनी कपाळावर कुंकू लावणे : स्त्रियांनी कपाळावर भ्रूमध्यापासून (दोन्ही भुवयांच्या मध्य भागापासून) अर्धा सें.मी. वर गोल कुंकू लावावे.) विवाहित स्त्रियांनी कपाळावर १ ते १.५ सें.मी. व्यासाचे कुंकू लावावे आणि अविवाहित स्त्रियांनी कपाळावर ०.५ सें.मी. व्यासाचे कुंकू लावावे. दोन्ही आकारांमुळे स्त्रियांमध्ये सुप्तावस्थेत असणारे श्रीदुर्गादेवीचे तत्त्व जागृत होऊन कार्यरत होते. कुमारिका (अविवाहित) कन्यांनी कुंकू लावल्यामुळे त्यांच्यामध्ये श्रीदुर्गादेवीची अप्रगट शक्ती आणि सुवासिनी स्त्रियांनी कपाळाला कुंकू लावल्यामुळे त्यांच्यामध्ये श्रीदुर्गादेवीची प्रगट शक्ती कार्यरत होते.

२ आ. पुरुषांनी कपाळावर कुंकू लावणे : पुरुषांनी कपाळावर कुंकवाचा उभा टिळा कपाळाच्या उंचीच्या अर्ध्या किंवा पाऊण भागाइतक्या लांबीचा लावावा. टिळा २ ते २.५ सें.मी. लांबीचा लावावा. त्यामुळे पुरुषांमध्ये सुप्तावस्थेत असणारे शिवतत्त्व जागृत होऊन ते कार्यरत होते. पुरुषांनी ज्योतीप्रमाणे दिसणारा कुंकवाचा भरीव उभा टिळा लावल्यावर त्यांच्यामध्ये शिवतत्त्व आणि इंग्रजीतील ‘U’ च्या आकारातील टिळा लावल्याने विष्णुतत्त्व जागृत होते .

३. उभट किंवा गोलाकार चेहर्‍याप्रमाणे कुंकवात करावयाचे पालट

तोंडवळा उभा असेल, तर पुरुषांनी अधिक लांबीचा, म्हणजे २.५ ते ३ सें.मी. लांबीचा कुंकवाचा टिळा लावावा आणि गोल तोंडवळा असेल, तर कपाळाच्या अर्ध्या लांबीचा टिळा लावावा. स्त्रियांचा तोंडवळा उभा असेल, तर त्यांनी कपाळावर भ्रूमध्यापासून १ सें.मी. वर गोल कुंकू लावावे आणि गोल असेल, तर ०.५ सें.मी. वर गोल कुंकू लावावे.

टीप : सर्वसाधारण चेहर्‍याच्या व्यक्तीच्या संदर्भात कुंकू लावण्याची वरील मापे दिली आहेत. व्यक्तीच्या चेहर्‍यानुसार त्यांनी योग्य त्या प्रमाणात मापे ठरवावीत.

४. ज्योतीप्रमाणे भरीव आकाराचा कुंकवाचा टिळा आणि भरीव गोल आकारातील कुंकू अन् इंग्रजीतील U च्या आकाराचा पोकळ कुंकवाचा टिळा यांतील भेद

कु. मधुरा भोसले

५. कुंकू आणि विभूती स्वतःला आणि इतरांना लावायची पद्धत

५ अ. कुंकू लावण्याची पद्धत : स्वत:ला कुंकू लावतांना अनामिकेने लावावे. त्यामुळे कुंकवामध्ये तारक शक्ती कार्यरत होते. इतर व्यक्तींना वाईट शक्तींचा त्रास असल्यास त्याचा कुंकू लावणार्‍या व्यक्तीला त्रास होऊ नये, यासाठी तेजतत्त्व प्रधान असणार्‍या मध्यमेने किंवा आकाशतत्त्व प्रधान असणार्‍या अंगठ्याने इतरांना कुंकू गोलाकारात किंवा टिळा लावावा.

५ आ. विभूती लावण्याची पद्धत : विभूती तेजतत्त्वप्रधान असल्यामुळे तिच्यातील तेजतत्त्वाचा लाभ स्वत:ला अधिकाधिक प्रमाणात होण्यासाठी स्वत:ला विभूती लावतांना मध्यमेने लावावे. इतरांना विभूतीतील चैतन्य आणि तेजतत्त्व यांचा लाभ व्हावा, यासाठी त्यांनाही तेजतत्त्वप्रधान असणार्‍या मध्यमेने विभूती लावावी.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.५.२०१९, रात्री ११.३४)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.