पंजाब येथील खलिस्तानी आतंकवाद्याला नांदेड येथे अटक

  • पंजाब पोलीस आणि नांदेड स्थानिक गुन्हे शाखा यांची संयुक्त कारवाई

  • हिंदु संघटनेच्या नेत्यांना लक्ष्य करण्याचा डाव !

खलिस्तानी अतिरेकी सरबजितसिंग किरट

नांदेड – बंदी घातलेल्या खलिस्तान जिंदाबाद या आतंकवादी संघटनेच्या एका सदस्याला येथील तहसील कार्यालयाच्या परिसरातून दुपारी अटक करण्यात आली. पंजाब राज्य गुन्हे अन्वेषण पोलीस आणि नांदेड स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी संयुक्त कारवाई करत त्याला कह्यात घेतले. सरबजीतसिंग किरट असे त्याचे नाव असून पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील तो रहिवासी आहे. अटकेनंतर त्याला पंजाब पोलिसांच्या कह्यात देण्यात आले आहे. खलिस्तानचा विरोध करणारे हिंदु संघटनांच्या  नेत्यांना लक्ष्य करण्याचा त्याचा डाव होता. (हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना आता जिहादी आतंकवाद्यांच्या पाठोपाठ खलिस्तानी आतंकवाद्यांचा धोका आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक)

खलिस्तान जिंदाबाद संघटनेच्या ४ जणांविरुद्ध अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांपैकी सरबजीतसिंग येथे लपला असल्याची गुप्त माहिती पंजाब राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाला मिळाली होती. त्या अनुषंगाने पंजाब पोलीस येथे आले होते. बेल्जियममधील खलिस्तान समर्थक आतंकवादी संघटनेच्या तो संपर्कात होता. त्या ठिकाणाहून त्याला आतंकवादी कारवायांसाठी पैसे पुरवले जात होते.