वारंवार पाण्याची नासाडी होऊन नागरिकांची गैरसोय होत असल्याने याकडेे दुर्लक्ष करणार्या संबंधित अधिकार्यावर कठोर कारवाई हवी !
यवतमाळ, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – दिग्रस शहरातील मानोरा चौकाकडे जाणार्या रस्त्यावरील जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीचा ‘एअर कॉक’ अचानक निसटला. त्यामुळे सिमेंटच्या खांबातील जलवाहिनीमधून अंदाजे ३० फूट उंच पाण्याचे फवारे उडाले. त्या वेळी नागरिकांची तारांबळ उडाली. हा फवारा जलवाहिनीवरून जाणार्या विद्युत् तारांना स्पर्श करत होता. त्यामुळे रस्त्यावरून जाणार्या वाहनधारकांना, तसेच जवळच असणार्या दुकानदारांच्या मनात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जलवाहिनी लवकर दुरुस्त केली गेली; मात्र तोपर्यंत लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला होता.
शहराच्या लगतच असलेल्या अरुणावती धरणावरून मानोरा शहरासह तालुक्यातील २८ गावांना या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. अरुणावती प्रकल्पातून पाणी पुरवठा करणारी ही जलवाहिनी तीन मासांपूर्वीही रस्त्याचे काम चालू असतांना फुटली होती.