मी कायमच गंगा आणि तिच्या उपनद्या यांवरील जलविद्युत प्रकल्पांच्या विरोधात होते ! – उमा भारती

उमा भारती जेव्हा केंद्रीय मंत्री होत्या तेव्हा त्यांनी वीजनिर्मिती करण्यासाठी धरणे बांधू नयेत, असे प्रतिज्ञापत्र सांगूनही त्यावर कार्यवाही का झाली नाही ? जनतेसाठी, तसेच पर्यावरणासाठी हानीकारक असणारे असे प्रकल्प उभारणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

उमा भारती याची चेतावणी

हरिद्वार (उत्तराखंड) – उत्तरखंडमध्ये हिमकडा तुटल्याने आलेला प्रलय हा चिंतेचा विषय आहे. मी स्वत: केंद्रीय मंत्री असतांना माझ्या मंत्रालयाच्या वतीने उत्तराखंडमध्ये हिमालयातून येणार्‍या नद्यांवर बांधण्यात येणार्‍या धरणांविषयी जे प्रतिज्ञापत्र सादर केले होते त्यामध्ये हिमालय हे अतिशय संवेदनशील ठिकाण असून गंगा आणि तिच्या प्रमुख उपनद्या यांवर वीजनिर्मिती करण्यासाठी धरणे बांधली जाता कामा नये, असे म्हटले होते. धरणे बांधून वीजनिर्मिती करण्यास माझा विरोध होता, असे ट्वीट माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी केले आहे. ‘धरणे न बांधल्याने उत्तराखंडला १२ टक्के अल्प वीज मिळते ती राष्ट्रीय ग्रीडमधून पुरवण्यात यावी’, असेही या प्रतिज्ञापत्रात मी म्हटले होते, असेही त्यांनी पुढे सांगितले. उत्तरखंड येथील जोशी मठ परिसरात हिमकडा कोसळून आलेल्या पुरामुळे झालेल्या हानीवर त्यांनी हे ट्वीट केले.

१. उमा भारती यांनी पुढील ट्वीटमध्ये म्हटले की, काल मी उत्तर काशीमध्ये होते. आज हरिद्वारला पोचले आहे. हरिद्वारमध्येही सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. याचाच अर्थ या प्रलयाचा फटका हरिद्वारलाही बसू शकतो. ऋषीगंगा नदीवर झालेला हा अपघात हा चिंतेचा विषय असून यामधून चेतावणीही मिळत आहे.

२. या पुरामुळे ‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन’चा (एन.टी.पी.सी.चा) धौलीगंगा नदीवरील तपोवन-विष्णुगड जलविद्युत प्रकल्प आणि ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्प यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. ऋषीगंगा नदीवरील एक लघु जलविद्युत प्रकल्पही वाहून गेल्याची माहिती इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या प्रवक्त्याने दिली.