येणार्‍या जनगणनेत लिंगायत बांधवांनी त्यांचा धर्म केवळ ‘हिंदु धर्म’असाच लिहावा ! – डॉ. विजय जंगम, प्रवक्ते, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ

  • विरोधकांना खणखणीत चपराक देत शिवाचार्य आणि समाज बांधव यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचा ९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

  • आमच्या पंचाचार्यांकडे वाकड्या दृष्टीने पाहिल्यास ‘दे माय धरणी ठाय’ करू

व्यासपिठावर उपस्थित संत आणि मान्यवर

कोल्हापूर, ६ फेब्रुवारी (वार्ता.) – आपला देश कायद्याने चालतो. इतकी वर्षे आपण स्वतःला ‘हिंदु’ म्हणवून घेत होतो. तेच आपण यापुढील काळात ठामपणे सांगितले पाहिजे. त्यामुळे येणार्‍या जनगणनेत लिंगायत बांधवांनी त्यांचा धर्म केवळ ‘हिंदु धर्म’ असेच लिहावा. आमचे पंचाचार्य आमचे प्राण आहेत. त्यामुळे आमच्या पंचाचार्यांकडे वाकड्या दृष्टीने पाहिल्यास, तसेच त्यांच्या भगव्या वस्त्रावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास ‘दे माय धरणी ठाय’ करू, अशी खणखणीत चेतावणी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे प्रवक्ते डॉ. विजय जंगम स्वामी यांनी दिली. ६ फेब्रुवारी या दिवशी बिंदू चौक येथील ‘अक्कमहादेवी मंटप’ येथे आयोजित महासंघाच्या ९ व्या वर्धापनदिन सोहळ्यात प्रस्ताविक करतांना ते बोलत होते.

व्यासपिठावर बोलतांना डॉ. विजय जंगम

डॉ. विजय जंगम स्वामी पुढे म्हणाले, ‘‘संघटनेत शिस्त, समाजाचे दायित्व यात कुठेही आपण तडजोड करणार नाही. महासंघाचे काम देशभर आहे, असे असतांना काही ठराविक लोक याला विरोध करण्याचे काम करत आहेत. आपल्या व्यासपिठावर संत-धर्माचार्य आहेत. यामुळे आपल्या कार्यक्रमात आध्यात्मिक ऊर्जा मिळते आणि याला विरोध करण्याची क्षमता कुणातच नाही. आपला २५ वा वर्धापनदिन शिवतीर्थावर व्हावा ही मनोकामना आहे.’’

या प्रसंगी इचलकरंजी येथील संतोष तथा बाळ महाराज महाराज म्हणाले, ‘‘छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मांतर करणार्‍या पाद्य्रांना धडा शिकवला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य हे धर्मासाठीच होते. असे असतांना काही संघटना छत्रपती शिवाजी महाराज हे ‘सर्वधर्मसमभावी’ होते, असा खोटा प्रचार करत आहेत. आपण सर्व शिवाचे म्हणजेच मूळ स्वरूपाचे वंशज आहोत.’’ या प्रसंगी अन्य मान्यवरांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी सर्वांनी हात उंचावून ‘हर हर महादेव’चा जयघोष केल्यानंतर उपस्थितांकडून ‘महादेव शिवशंकर शंभो उमाकांत हरे त्रिपुरारे’ हा नामजप करून घेण्यात आला. या कालावधीत मध्ये मध्ये शंख वाजवण्यात येत होता. यामुळे वातावरणात चैतन्य पसरले. यानंतर धारेश्‍वर येथील ष.ब्र. १०८ डॉ. नीलकंठ शिवाचार्य महाराज, तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

दीपप्रज्वलन प्रसंगी उपस्थित ष.ब्र. १०८ डॉ. नीलकंठ शिवाचार्य महाराज, तसेच अन्य मान्यवर

या प्रसंगी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. संतोष जंगम (स्वामी), राष्ट्रीय सचिव प्रवक्ता वैजनाथ स्वामी, महिला आघाडीप्रमुख सौ. विद्याताई जंगम, श्री. ज्ञानेश्‍वर अस्वले, सोलापूर येथील मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, इचलकरंजी येथील नगराध्यक्षा सौ. अलका अशोक स्वामी, संभाजीनगर येथील म्हाडाचे सभापती संजय केनेकर यांसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. या वेळी मांजरसुंबा येथील ष.ब्र. १०८ वीरूपाक्ष शिवाचार्य महाराज, मुखेड येथील ष.ब्र. वीरूपाक्ष शिवाचार्य महाराज, तसेच अन्य लिंगायत स्वामीजी उपस्थित होते.

क्षणचित्रे

  • सर्वांनी भगवे फेटे परिधान केले होते, तसेच सर्वांना गळ्यात परिधान करण्यासाठी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ शाखा कोल्हापूर असे भगवे उपरणे देण्यात आले होते.
  • काहींनी भगवे ‘मास्क’ परिधान केले होते, तसेच सर्वांना भस्म लावण्यात येत होते.
  • ‘गर्व से कहो हम हिंदु’, है अशी घोषणा देण्यात आली.
  • व्यासपिठावर समाजातील शिवाचार्य यांना अग्रक्रमाने स्थान देण्यात आले होते. यामुळे संतांचा आशीर्वाद आणि आध्यात्मिक शक्ती यांमुळेच सभा पार पडत आहे, या संदेश संयोजकांनी दिला.

विशेष

  • मेळाव्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांतील समाजबांधव असूनही सर्वांमध्ये एकमेकांविषयी आपुलकी, ममत्व जाणवत होते.
  • लिंगायत समाजाच्या झेंड्यासमवेत कार्यक्रमस्थळी भगवे झेंडे लावण्यात आले होते.
  • ‘हिंदु म्हणून जन्मा आलो-हिंदु म्हणून जगणार’, असे गाणे अधूनमधून लावण्यात येत होते.
अन्य घोषणांसमवेत डॉ. विजय जंगम स्वामी यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘वन्दे मातरम्’ या घोषणाही दिल्या.