६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मिरज येथील कु. वरुण शेट्टी (वय ७ वर्षे) !

पौष कृष्ण पक्ष एकादशी (७.२.२०२१) या दिवशी कु. वरुण शेट्टी याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

(‘वर्ष २०१९ मध्ये कु. वरुण याची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के होती.’ – संकलक)

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ –  परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. वरुण शेट्टी

कु. वरुण शेट्टी याला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. दळणवळण बंदीच्या वेळी खेळणी आणि भांडी यांचे साहाय्य घेऊन घरातच देवाची स्थापना करून त्यांची पूजा करणे

‘मार्च २०२० मध्ये कोरोनामुळे दळणवळण बंदी होती. त्या वेळी वरुणने खेळतांना कालभैरव, शिव, बालाजी आणि विठ्ठल-रुक्मिणी यांची स्थापना घरातच केली होती. तो त्यांची पूजाही करत होता. या स्थापनेसाठी त्याने खेळणी आणि भांडी यांचे साहाय्य घेतले होते.

अ. त्याने खेळण्यातील ठोकळ्यांची मांडणी केली होती आणि ‘हे शिवमंदिर आहे’, असे तो सांगायचा, तसेच ‘ठोकळ्यांपासून बनवलेली ही गाडी मंदिराकडे जाणारी आहे’, असे सांगायचा.

आ. तो कोरोनाच्या कालावधीत बाहेर अंगणात बसायचा आणि ‘मी कालभैरव आहे अन् घराचे रक्षण करत आहे’, असे म्हणायचा.

इ. तो भांड्यांची मांडणी करायचा आणि ‘हे शिवपंचायतन आहे’, असे सांगून ‘मध्ये असलेला थर्मास म्हणजे मुख्य शिव आहे’, असे सांगायचा.

ई. त्याने भूमीवर एक काठी खोवायचा आणि म्हणायचा, ‘‘मी शिवाला अभिषेक घालत आहे आणि समोर त्रिशूळ लावले आहे.’’

उ. वरुणने परात्पर गुरु डॉक्टरांची प्रतिमा मांडून पूजा केली.

ऊ. ‘नारळाची करवंटी म्हणजे शिव, खेळणे म्हणजे शिवलिंग आणि काठी म्हणजे त्रिशूळ आहे’, अशी रचना करून तो सांगतो. त्याने त्याची पूजा केली आहे आणि ‘तो तांडवेश्‍वर देव आहे’, असे तो सांगतो. ‘त्याचे स्थान कोठे आहे ?’, असे विचारल्यावर ‘हे देवस्थान अमरनाथपासून ३० कि.मी. अंतरावर आहे’, असे तो सांगतो.

२. २५.५.२०२० या रात्री मी त्याच्या उशीजवळ ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ ठेवला होता आणि २६.५.२०२० या दिवशी सकाळी उठल्यावर पाहिले, तर तो ग्रंथ कुशीत घेऊन झोपलेला होता.

३. स्वप्नामध्ये ब्रह्मलोक, विष्णुलोक आणि कैलास येथे जाऊन खेळल्याचे आणि हे सर्व करतांना पुष्कळ मजा वाटल्याचे वरुणने सांगणे

२१.४.२०२० या दिवशी वरुणशी झालेला संवाद पुढे दिला आहे.

वरुण : मी काल रात्री स्वप्नात ब्रह्मलोकात गेलो होतो.

मी (आई) : तेथे कोण होते ? तू (तेथे जाऊन) काय केलेस ?

वरुण : मी ब्रह्मदेवाला कमळावर बसलेले पाहिले. मी ब्रह्मदेवाचा कमंडलू घेऊन खेळत होतो. नंतर विष्णुलोकात गेलो.

मी : तेथे काय केलेस ?

वरुण : विष्णुलोकात श्रीविष्णु शेषनागावर झोपला होता. तेथून पुढे मी कैलासात गेलो.

मी : कैलासात जाऊन काय केलेस ?

वरुण : मी तेथे नंदीदेवावर बसून फेरी मारली. मी भगवान शंकराचे त्रिशूळ घेऊन खेळत होतो. नंतर भगवान शंकराला अभिषेक करून त्याची पूजा आणि आरती केली. मला हे सर्व करतांना पुष्कळ मजा वाटत होती.

४. वरुणने देवाला स्थुलातून भेटण्याचा हट्ट करणे, त्याची समजूत काढता येत नाही; म्हणून गुरुदेवांना प्रार्थना करणे आणि त्याची चूक त्याच्या लक्षात आणून दिल्यावर त्याची मोठ्या भावाशी होणारी भांडणे थांबणे

नंतर तो मला म्हणाला, ‘‘हे सर्व मला स्थुलातून अनुभवायचे आहे आणि आताच तेथे जायचे आहे. मी केवळ तुला एकटीलाच तेथे घेऊन जाईन.’’ तो देवाला स्थुलातून बघण्यासाठी सलग दोन दिवस शंकराच्या नामपट्टीसमोर उभा राहून हट्ट करत होता. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, तरी त्याचे समाधान होत नव्हते. तेव्हा मी गुरुदेवांना प्रार्थना केली. ‘देवा, मला याच्या प्रश्‍नांची उत्तरे देता येत नाहीत आणि त्याची समजूतही काढता येत नाही.’

त्या वेळी देवाने त्याच्याकडून होत असलेली चूक एका प्रसंगातून लक्षात आणून दिली. तो त्याच्या मोठ्या भावाच्या हातातून कोणतेही साहित्य काढून घेतो; परंतु स्वतःच्या वस्तू इतरांना देत नाही. ‘इतरांच्या वस्तू माझ्याच आहेत’, असे त्याला वाटते; म्हणून मी त्याला म्हणाले, ‘‘आपले मन जर छोट्या छोट्या वस्तूत अडकत असेल, तर देव आपल्याला स्थुलातून भेटेल का ? तू तुझे सोडल्यावर देवाचा प्रिय होशील आणि तेव्हा देव तुला नक्की भेटेल. शबरीमातेने श्रीरामाची किती वर्षे वाट पाहिली, तरी ती देवावर रुसली नाही, तर ‘आज देव येणारच आहेत’, या विश्‍वासाने प्रतिदिन सिद्धता करत होती. जेव्हा तिला देव भेटला, तेव्हाच तिला मोक्ष मिळाला. आपणही त्याप्रमाणे प्रतिदिन सिद्धता करूया आणि गुरुदेवांना प्रार्थना करूया.’’ हे सांगितल्यावर त्याची मोठ्या भावाशी होणारी भांडणे अल्प झाली.

५. गुरुमाऊली महादेव असल्याचे सांगणे

१३.५.२०२० ते १५.५.२०२० या कालावधीत गुरुमाऊलींचा जन्मोत्सव होता. त्या वेळी वरुणने गुरुदेवांच्या छायाचित्राची पूजा केली आणि मला म्हणाला, ‘‘तुम्ही सर्व जण ‘गुरुदेव नारायण आहेत’, असे सांगता आणि श्रीकृष्णाला प्रार्थना करता; परंतु ते महादेव आहेत, तरी माझ्या महादेवाची पूजा करा अन् त्याला प्रार्थना करा.’’

६. घड्याळातील १२ आकड्यांकडे बघून वरुणने सांगितलेली सूत्रे

अ. १ – एकमुखी मारुति

आ. २ – गणपतीचे दोन दात

इ. ३ – त्रिनेत्री शिव

ई. ४ – चतुर्भुज भैरव

उ. ५ – पंचमुखी हनुमान

ऊ. ६ – सहा भुजा असलेला दत्त

ए. ७ – सप्तशृंगीमाता

ऐ. ८ – अष्टविनायक

ओ. ९ – नवदुर्गा, नवग्रह

औ. १० – विष्णूचे दहा अवतार

अं. ११ – अकरा रुद्र

क. १२ – १२ ज्योतिर्लिंगे’

– सौ. राजलक्ष्मी शेट्टी (कु. वरुणची आई), मिरज (४.११.२०२०)


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक