‘श्रीविष्णुतत्त्व जागृतीसोहळ्या’निमित्त कु. शर्वरी कानस्कर हिचा नृत्याचा सराव घेतांना जाणवलेली सूत्रे आणि प्रत्यक्ष सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘श्रीविष्णुतत्त्व जागृतीसोहळ्या’निमित्त कु. शर्वरी कानस्कर हिचा नृत्याचा सराव घेतांना जाणवलेली सूत्रे आणि प्रत्यक्ष सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती

महर्षींच्या आज्ञेने ११.१२.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘श्रीविष्णुतत्त्व जागृती सोहळा’ झाला. या वेळी कु. शर्वरीला (मुलीला) नृत्यसेवा करण्याची संधी मिळाली. शर्वरीला नृत्य शिकवण्याच्या कालावधीत आणि सोहळ्यात साधकांनी सादर केलेल्या गायन, वादन आणि नृत्य या सेवांच्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

 

सौ. अनुपमा कानस्कर

१. कु. शर्वरीचा नृत्याचा सराव घेतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१ अ. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होऊन संधीचा लाभ होण्यासाठी प्रयत्न करणे : कु. शर्वरीचा नृत्याचा सराव घेतांना माझी श्रीकृष्णाला प्रार्थना होत होती. शर्वरीला नृत्य करण्याची संधी मिळाली; म्हणून माझी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता होत होती. त्या वेळी मनात विचार आला, ‘शर्वरी करणार असलेली नृत्यसेवा ही तिला मिळालेली पहिली आणि शेवटची संधी आहे. या संधीचा चांगल्या प्रकारे लाभ करून घ्यायला हवा.’

१ आ. शर्वरीचा नृत्याचा सराव घेतांना अनेक गोष्टी शिकायला मिळणे आणि ‘या सोहळ्यात शर्वरीच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली’, याविषयी कृतज्ञता वाटणे अन् प्रार्थना होणे

१. ‘कु. शर्वरी नृत्यातील प्रत्येक पदन्यास सोप्या पद्धतीने सादर करू शकेल आणि गाण्याला अनुसरून तिच्याकडून भाव व्यक्त व्हायला हवेत’, या दृष्टीने शेवटच्या क्षणापर्यंत पालट झाले. माझी श्रीकृष्णाला ‘तुला अपेक्षित अशी सूत्रे लक्षात आणून दे’, अशी प्रार्थना होत होती. शर्वरीचा सराव करून घेतांना मला पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या. ‘नृत्याच्या वेळचे गाण्याचे शब्द, त्या वेळी वाजवले गेलेले वाद्य आणि नृत्याचे सादरीकरण असे पाहिजे की, ते सगळ्यांना समजले पाहिजे आणि सगळ्यांना त्याचा आनंद मिळेल’, या दृष्टीने माझ्याकडून प्रयत्न होत होते.

२. सोहळ्याच्या एक दिवस आधी ‘ध्वनीचित्रीकरण कक्षात परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांच्या सभोवती देवता, ऋषिमुनी आणि देवगण बसले आहेत. ते हा सोहळा बघत आहेत आणि सोहळ्याचे कौतुक करत आहेत’, असा भाव निर्माण होऊन मला कृतज्ञता वाटत होती. ‘हा ईश्‍वराचा भावसोहळा आहे. परात्पर गुरु डॉक्टर हा सोहळा करवून घेणार आहेत. मला या सोहळ्यानिमित्त सेवा करण्याची आणि सोहळा बघण्याची संधी मिळत आहे’, असे विचार येऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

३. शर्वरीला नृत्यसेवेसाठी सिद्ध करतांना ‘श्रीकृष्णाच्या राधेची सिद्धता करत आहे’, असा माझा भाव होता. ‘हे श्रीकृष्णा, तुला जशी राधा अपेक्षित आहे; तशीच तू माझ्याकडून शर्वरीची सिद्धता करवून घे. तूच होणारी चूक लक्षात आणून दे आणि तूच चूक सुधारूनही घे’, अशी माझ्याकडून प्रार्थना होत होती.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘श्रीविष्णुतत्त्व जागृती’ सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती

२ अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांवर फुले अर्पण केली. तेव्हा मला वाटले, ‘ही पुष्पे नसून पुष्परूपी मोतीच आहेत.’

२ आ. कु. पार्थ पै याचे बासरीवादन : कु. पार्थ पै बासरीवादन करतांना ‘मी गोकुळात पोचले आहे आणि मी बासरीवादन लक्षपूर्वक ऐकत आहे’, असे मला जाणवले. मला त्या स्थितीतून बाहेर यावेसे वाटत नव्हते. ‘बासरीच्या नादाचे तरंग पूर्ण वातावरणात पसरले आहेत’, असे मला जाणवले.

२ इ. श्री. मनोज सहस्त्रबुद्धे यांचे सतारवादन : श्री. मनोज सहस्त्रबुद्धे सतार वाजवत असतांना मला आकाशतत्त्वाची अनुभूती येत होती. माझे ध्यान लागून माझा आपोआप नामजप चालू झाला. मला आज्ञाचक्रापासून सहस्रारचक्रापर्यंत संवेदना जाणवत होत्या. ते जलद गतीने सतार वाजवतांना माझे मन अधिक एकाग्र झाले.

२ ई. कु. तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी यांचे गायन : सौ. अनघा जोशी आणि कु. तेजल पात्रीकर भजन गात असतांना ‘भगवान श्रीकृष्ण तिथे उभा असून कु. तेजलताई भावावस्थेत गेली आहे’, असे मला दिसले. ‘गुरुदेवच तिच्याकडून भजन म्हणवून घेत आहेत’, असे मला वाटले. भावाश्रू आले.

२ उ. शर्वरी नृत्य करत असतांना ‘स्वतः नृत्य करत आहे’, असे वाटणे : शर्वरीने नृत्य करायला आरंभ केल्यावर श्रीकृष्णाला प्रार्थना झाली, ‘केवळ तिचे शरीर तिथे आहे. तूच तिच्याकडून नृत्य करवून घे. मला जी सेवा मिळाली होती, ती तुमच्या चरणी अर्पण करते. या सेवेत झालेल्या चुकीसाठी मी क्षमा मागते. हे नृत्य बघून सगळ्यांना आनंद मिळू दे.’ शर्वरीचे नृत्य पूर्ण झाल्यावर मला वाटले, ‘मीही तिच्या समवेत नृत्य करत होते.’ माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू येऊन माझी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त झाली, ‘तुमची केवढी कृपा आहे. आमची योग्यता नसतांना तुम्हीच हे सर्व करवून घेतले आणि शर्वरीला नृत्य करण्याची संधी दिली. हे आमचे सौभाग्य आहे.’

– सौ. अनुपमा कानस्कर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.५.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक