बीड येथे ठेकेदाराकडून रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी

बीड – तालुक्यातील घारगाव ते अंजनवती या ६ ते ७ किलोमीटर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. याविषयी अनेक वेळा तक्रार करूनही संबंधित विभाग आणि जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत. रस्त्यावर केवळ खडी आणि डांबर टाकून पाट्याटाकूपणे रस्ता करण्याचे काम चालू आहे. हा रस्ता हातानेही उकरला जात असल्याची स्थिती आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तात्काळ थांबवून झालेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची चौकशी करा, तसेच संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. (अशी मागणी नागरिकांना का करावी लागते, प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ? – संपादक) 

घारगाव ते अंजनवती हा पक्का रस्ता अत्यंत निकृष्ट होत आहे, याची कल्पना स्थानिक लोकप्रतिनिधींना असूनही लोकप्रतिनिधी गप्प का ? असा प्रश्‍न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे, तसेच लोकप्रतिनिधी ठेकेदारांची पाठराखण करत असल्याचा आरोपही ग्रामस्थ करत आहेत.