पालघर येथे शाळेत जीन्स घालून येणार्‍या ५ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस !

दोन दिवसांमध्ये उत्तर न दिल्यास कारवाई करण्याची चेतावणी

  • विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकांनाही धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता !

  • राज्यातील सर्वच शाळांमध्ये शासनाने कर्मचारी आणि अधिकारी यांनी पाश्‍चात्त्य पद्धतीचे कपडे न घालणे बंधनकारक करावे !

पालघर – येथील विक्रमगड तहसीलच्या सरकारी शाळेत ५ शिक्षकांना जीन्स घालून आल्याप्रकरणी शिक्षण विभागाने २ फेब्रुवारी या दिवशी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. नोटिसीनुसार २ दिवसांच्या आत या शिक्षकांना त्यांची उत्तरे घेऊन कार्यालयात उपस्थित रहाण्यास सांगण्यात आले आहे. वेळीच उत्तर न दिल्यास पुढील कारवाई केली जाईल, अशी चेतावणी शिक्षण विभागाने शिक्षकांना दिली आहे. नोटिसीमध्ये म्हटले आहे की, शासनाने लागू केलेल्या परिपत्रकात शिक्षकांना शालीन आणि सभ्य कपड्यांमध्ये शाळेत येण्यास सांगितले आहे. त्यानंतरही आदेशाचे पालन का केले जात नाही ?

शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करावे, या संदर्भात महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी परिपत्रक लागू केले होते. कार्यालयातील शिक्षण विभागाचे अधिकारी आणि शाळेत शिक्षक यांनी ‘जीन्स टी-शर्ट’ घालू नये. कर्मचारी आणि अधिकारी यांनी आठवड्यातून एकदा खादीचे कपडे घालावे. महिलांनी साड्या, सलवार, कुर्ता, शर्ट आणि ट्राऊजर घालावे, तसेच शासकीय कार्यालयांत स्लीपर घालण्याची अनुमती नाही. महिला कर्मचार्‍यांनी पादत्राणे, सँडल किंवा शूज घालावेत. पुरुष कर्मचार्‍याने नेहमीचे शूज किंवा पादत्राणे घालावीत, असे शासनाने नियमावलीत म्हटले आहे.