(म्हणे) ‘आजचा हिंदु समाज हा पूर्णतः सडला असून भारतात मुसलमानांवर अन्याय होत आहे !’

एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापिठातील विद्यार्थी शरजील उस्मानी याची हिंदुद्वेषी गरळओक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात कोणीही येऊन हिंदूंची अपकीर्ती करून जातो आणि त्याच्यावर कारवाई होत नाही, हे संतापजनक नाही का ?

पुणे – आजचा हिंदु समाज हा पूर्णतः सडला असून भारतात मुसलमानांवर अन्याय होत आहे. भारतात मुसलमानांना मारून टाकण्यासाठी कोणत्याही कारणाची आवश्यकता नाही. मुसलमान आहात, हे कारण पुरेसे आहे. उत्तरप्रदेश पोलिसांनी एका वर्षात १९ लोकांची हत्या केली. यात सर्वजण दलित किंवा मुसलमान होते, अशी गरळओक अलिगढ मुस्लिम विद्यापिठातील विद्यार्थी शरजील उस्मानी याने पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडलेल्या एल्गार परिषदेत केल्यामुळे परिषद पुन्हा एकदा वादग्रस्त ठरली आहे.

उस्मानी पुढे म्हणाला की, हे लोक ‘लिंचिंग’ (जमावाने ठार मारणे) करतात. हत्या करतात. हत्या करून हे लोक स्वत:च्या घरी जातात, त्या वेळी ते काय करत असावेत ? काही नवीन पद्धतीने हात धूत असावेत किंवा काही औषधे मिसळून स्नान करत असावेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्तेत आल्यानंतर एका वर्षात १६ दलित आणि मुसलमान यांचे ‘एन्काऊंटर केले, असा दावाही त्याने केला. त्याच्या या वक्तव्यामुळे संतापाची लाट उसळली असून त्याच्यावर कारवाईची मागणी होत आहे.  (आरोपींना वादग्रस्त भाषण करण्यास अनुमती दिल्याविषयी एल्गार परिषदेच्या आयोजकांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी जनतेला अपेक्षा आहे. – संपादक)

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याविषयी प्रतिक्रिया देतांना सांगितले की, ही विकृत मानसिकता आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आणि आमदार राम सातपुते यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून शरजील उस्मानी याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आमदार राम सातपुते यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, एल्गार परिषदेमध्ये हिंदूंना ‘सडलेले’ संबोधणार्‍या शरर्जील उस्मानी याच्यावर तात्काळ कारवाई करावी. आयोजक संविधानाचे दाखले देतात आणि असल्या हिंदूविरोधी वक्त्यांना बोलावतात.

केशव उपाध्ये यांनी ट्वीटच्या माध्यमातून ‘महाराष्ट्रात येऊन थेट हिंदूना सडका म्हणायची मजल जाते. अशांच्यावर कारवाई करणार कि नुसते हिंदुत्व सोडले नसल्याच्या गप्पा मारणार ?’, असा प्रश्‍न उपस्थित करत मुख्यमंत्री कार्यालय आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना हे ट्वीट ‘टॅग’ केले आहे.

शरजील उस्मानी याचे वक्तव्य तपासून कारवाई ! – गृहमंत्री देशमुख

अनिल देशमुख

शरजील उस्मानी याने हिंदु समाजाविषयी केलेले वक्तव्य तपासून कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलतांना सांगितले.

वादग्रस्त पार्श्‍वभूमी असलेला शरजील उस्मानी !

शरजील उस्मानी

उस्मानी हा वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतो. देहलीतील सी.ए.ए. विरोधातील आंदोलनाच्या वेळी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर त्याला अटक झाली होती. त्याने त्या वेळी ट्विटरवर एक छायाचित्र ‘शेअर’ केले होते आणि त्यात ‘पुन्हा बाबरी उभारू !’, असे लिहिले होते. त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली होती. नंतर तो जामिनावर सुटला. कारागृहात माझी तुलना अजमल कसाबशी केली गेली,असे शरजीलने कारागृहातील स्वत:चा अनुभव सांगतांना सांगितले.