शंखवाळी तीर्थक्षेत्री पूर्वी श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या ठिकाणी पूर्जाअर्चा केल्याचे प्रकरण
पणजी, ३१ जानेवारी (वार्ता.) – ख्रिस्ती गीतकार आणि गायक फ्रान्सीस द तुये यांनी ‘सांकवाळे अयोध्या कोत्ता ?’ (सांकवाळची अयोध्या करता का ?) हे ‘कातार’ (कोकणी गाणे) सिद्ध करून ते यू ट्यूबवर प्रसारित केले आहे. हे गाणे धार्मिक तेढ निर्माण करणारे ठरले आहे.
सांकवाळ येथील शंखवाळी तीर्थक्षेत्री पूर्वी श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर होते. शासनाने या स्थळाला आता वारसास्थळ घोषित केले आहे. शासनदरबारी या स्थळाला आता ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (सांकवाळचे प्रवेशद्वार) असे संबोधले जात आहे. या ठिकाणी ख्रिस्ती मागील सलग ४ वर्षे सेंट जोसेफ वाझ यांच्या फेस्ताचे आयोजन करत आहेत. सांकवाळ येथील शंखवाळी तीर्थक्षेत्रातील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या ठिकाणी (‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या ठिकाणी) ३० डिसेंबर २०२० या दिवशी देवीच्या स्थानिक भक्तगणांनी पूजा-अर्चा आणि नामस्मरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्थानिक ख्रिस्त्यांनी ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ ही ख्रिस्त्यांची भूमी असल्याचा दावा करून हिंदूंचा हा धार्मिक कार्यक्रम मध्येच बंद पाडला. ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या ठिकाणी हिंदूंनी धार्मिक कार्यक्रम केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी स्थानिक ख्रिस्त्यांनी शासनावर दबाव आणला. आता या घटनेला एक मास उलटल्यानंतर ख्रिस्ती गीतकार आणि गायक फ्रान्सीस द तुये यांनी ‘सांकवाळे अयोध्या कोत्ता ?’ हे ‘कातार’ सिद्ध करून सांकवाळ आणि अयोध्येच्या घटनांवर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.
(म्हणे) ‘विकास प्रकल्पांना होत असलेल्या विरोधावरील लक्ष इतरत्र वळवण्यासाठी शासनानेच सांकवाळ येथील प्रकरण रचले !’ – फ्रान्सीस द तुये, गीतकार आणि गायक
गीतकार आणि गायक फ्रान्सीस द तुये या गीताचा आशय सांगतांना म्हणतात, ‘‘गोव्यात लोकांच्या इच्छेच्या विरोधात शासन मेळावली येथील आयआयटी प्रकल्प, रेल्वेच्या लोहमार्गाचे दुपदरीकरण, कोळसा वाहतूक, मरिना प्रकल्प आदी प्रकल्प राबवत आहे. सांकवाळ येथील घटना ही या प्रकल्पांवरील लोकांचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी सरकारने केलेलीच एक चाल आहे, असा संशय येतो. ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या ठिकाणी शासकीय अनुमतीशिवाय २५ जणांनी एकत्र येऊन पूजा केली. (या घटनेशी शासनाचा कोणताही संबंध नाही. खरेतर ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ हे पूर्वीचे श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराचे स्थान आहे. त्यामुळे गेल्या ४-५ वर्षांपासून तेथील स्थानिक हिंदू या ठिकाणी झालेले चर्च संस्थेचे अतिक्रमण बंद होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शासन याची नोंद घेत नाही आणि पुरातत्व विभागही ख्रिस्त्यांच्या दबावाखाली या वारसास्थळी त्यांचे अतिक्रमण खपवून घेतो, हे हिंदूंसाठी दुर्दैवी आहे ! – संपादक) स्थानिक ख्रिस्त्यांनी या विरोधात कारवाई करण्याची मागणी करूनही शासन आणि पोलीस यांनी संबंधितांच्या विरोधात कोणतीच कारवाई केलेली नाही. ‘सरकारने काही लोकांना पुढे काढून सांकवाळ येथील प्रकरण रचले’, या सूत्रावरून ‘सांकवाळे अयोध्या कोत्ता ?’ हे गीत सिद्ध केले.
‘सांकवाळे अयोध्या कोत्ता ?’ या व्हिडिओमधून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ! – अधिवक्ता अमर नाईक
मी हिंदु आहे आणि मला हिंदु धर्माविषयी अभिमान आहे. सर्व धर्मांचाही मान राखतो. गीतकार फ्रान्सीस द तुये यांनी ‘सांकवाळे अयोध्या कोत्ता ?’ या ‘व्हिडिओ’मध्ये हिंदू सांकवाळ येथे ख्रिस्त्यांच्या भूमीत अतिक्रमण करत असल्याचे दर्शवले आहे आणि गीताच्या शिर्षकाला ‘अयोध्या’ असे नाव दिले आहे. गीताचा आशय आणि त्याला दिलेले शिर्षक याला माझा आक्षेप आहे. ‘हिंदूंनी सांकवाळ येथील ख्रिस्त्यांच्या भूमीत जाऊन तेथे अतिक्रमण केले आणि याच प्रकारे अयोध्या येथे हिंदूंनी दुसर्या धर्माच्या स्थळावर अतिक्रमण करून तेथे मंदिर उभारले’, असे यातून ध्वनीत होत आहे. अयोध्या ही श्रीरामजन्मभूमी आहे आणि हे सर्व जगाला ठाऊक आहे. ही एक पौराणिक भूमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या ही श्रीरामजन्मभूमी असल्याचा निवाडा दिल्यानंतर त्या ठिकाणी आता भव्य मंदिराची उभारणी केली जात आहे. या नावामुळे हिंदु धर्मियांच्या भावना भडकावून दंगल माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी ‘सांकवाळे अयोध्या कोत्ता ?’, या नावात पालट करणे आवश्यक आहे.