राजकारण्यांच्या कार्यक्रमांवर गुन्हे नोंद नाहीत; मात्र सामान्य माणसांवर का ? – राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

कोल्हापूर – २५ जानेवारी या दिवशी शासनाला पूर्वकल्पना देऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली ते कोल्हापूरपर्यंत २६ जानेवारी या दिवशी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. याला पोलिसांकडून अनुमती नाकारण्यात आली नव्हती. असे असतांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ट्रॅक्टर मोर्चा विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एकीकडे पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये मोठे कार्यक्रम पार पडले आहेत. त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही. राजकारण्यांच्या कार्यक्रमावर गुन्हे नोंद नाहीत; मात्र सामान्य माणसांवर का ?, असा प्रश्‍न स्वाभिमानी शेतकरी संघटननेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपस्थित करून या वृत्तीमुळेच काँग्रेस पक्ष रसातळाला गेला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.