आता डोळ्यांना न दिसणार्‍या शत्रूसमवेत आपले युद्ध चालू झाले आहे ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – दिवसेंदिवस गुन्ह्यांचे स्वरूप पालटत आहे. कोरोनाप्रमाणे गुन्हेगारी हाही एकप्रकारचा ‘व्हायरस’ आहे. ‘सायबर क्राईम’ डोळ्यांना दिसत नाही. न दिसणार्‍या शत्रूसमवेत आपले युद्ध चालू झाले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी दक्षिण विभाग ‘सायबर’ पोलीस ठाण्याचे प्रत्यक्ष उपस्थित राहून उद्घाटन केले, तर पूर्व, पश्चिम, उत्तर दक्षिण आणि मध्य विभाग ‘सायबर’ पोलीस ठाण्याचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले. त्या वेळी ते बोलत होते. याच कार्यक्रमात ९४ पोलीस ठाण्यांतील स्वागतकक्षांचे ऑनलाईन उद्घाटनही करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, भ्रमणभाषचा अपवापर वाढत आहे. आपल्याच साधनांचा वापर करून गुन्हे करणारी टोळी कार्यरत होत आहे. जगात कुठेही बसून घरातील माहिती, पैसे आणि अन्य गोष्टींची चोरी या माध्यमातून चालू आहे. असे असले, तरी गुन्हेगारी विश्वात धाक बसवणारे मुंबई हे देशातील पहिले शहर असेल, यासाठी मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा मला अभिमान आहे.