शेतकर्‍यांनीच त्यांच्या हत्येचा कट रचल्याची स्वीकृती देण्यास सांगितले !

देहलीतील आंदोलनकर्त्या शेतकरी नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याची स्वीकृती देणार्‍या संशयिताचाच दावा !

  • यातून जनतेला असे वाटेल की, शेतकरी सरकारला आणि सरकार शेतकर्‍यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत !
  • शेतकर्‍यांच्या आंदोलनात खलिस्तानवादी आणि भारतविरोधी घटक सहभागी झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अशा प्रकारे सरकारची आणि त्याहून अधिक देशाची अपकीर्ती होण्यासाठी असे षड्यंत्र रचले गेले होते का, याची सखोल चौकशी होऊन सत्य समोर येणे आवश्यक !
आंदोलनस्थळावरून अटक करण्यात आलेला संशयित

नवी देहली – येथे गेल्या २ मासांपासून चालू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनातील ४ शेतकरी नेत्यांना ठार करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात २२ जानेवारीच्या रात्री एका संशयिताला आंदोलनस्थळावरून अटक करण्यात आली होती. यामुळे शेतकर्‍यांकडून सरकारच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया आणि आंदोलन होण्याची शक्यता असतांनाच या संशयिताचा एक व्हिडिओ समोर आला असून तो यात, ‘शेतकर्‍यांनीच मला बलपूर्वक ‘मी त्यांची अशा प्रकारे हत्या करण्यासाठी आलो होतो’, असे विधान करण्यास सांगितले’, असा दावा करतांना दिसत आहे.

१. २६ जानेवारीला शेतकर्‍यांकडून ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा उधळून लावण्यासाठी शेतकरी नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याचे या संशयिताचे म्हटले होते. या संशयिताचे नाव योगेश आहे. तो या नव्या व्हिडिओत सांगत आहे, ‘मला शेतकर्‍यांनी जे बोलायला सांगितले, तेच बोलत आहे.’ या व्हिडिओची सत्यता पडताळण्यात आलेली नाही.

२. योगेश याने कट कशा प्रकारे रचण्यात आला होता, याची माहिती देतांना सांगितले की, आमचे दोन गट सिद्ध करण्यात आले होते. १९ जानेवारीपासून आम्ही आंदोलनस्थळी आहे. मला ‘शेतकरी स्वतः समवेत शस्त्र बाळगतात का ?’ याचा शोध घेण्याचे काम दिले होते. २६ जानेवारीला या शेतकर्‍यांना रोखण्यात येईल. तरीही शेतकरी थांबले नाहीत, तर त्यांच्यावर गोळीबार करण्याचे आदेश होते. दुसरीकडे १० जणांचा एक गट आहे. हा गट शेतकर्‍यांच्या मोर्च्यात सहभागी होऊन पाठीमागून गोळीबार करील. जेणेकरून आंदोलक घाबरून पांगतील. त्याचसमेवत व्यासपिठावर जे ४ लोक असतील, त्यांना गोळ्या घालण्याचा कट आहे. त्यांची छायाचित्रे देण्यात आली होती. ज्याने आम्हाला हे सांगितले, तो पोलीस आहे. त्याचे नाव प्रदीप सिंह आहे. तो राई पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तो नेहमी तोंडावळा झाकून भेटायला यायचा.