आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून त्यांची न्यायालयीन चौकशी करावी !

  • भंडारा येथील उपजिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत बालकांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण

  •  मृत बालकांच्या पालकांची मागणी

भंडारा – येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आधुनिक वैद्यांवर झालेली कारवाई आम्हाला मान्य नाही. दोषी आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून त्यांची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी मृत बालकांचे पालक आणि भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी २२ जानेवारी या दिवशी केली.

१. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतीदक्षता कक्षात लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी रुग्णालयातील दोषी आधुनिक वैद्य आणि कर्मचारी याच्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, या मागणीसाठी भंडारा जिल्हा भाजपच्या वतीने १५ जानेवारीपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘साखळी उपोषण’ चालू आहे.

२. २० जानेवारी या दिवशी आलेल्या चौकशी अहवालात रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक आणि आधुनिक वैद्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली, तर निवासी वैधकीय अधिकारी यांचे स्थानांतर करण्यात आले. यासह कंत्राटी तत्त्वावर सेवा देणारे आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांच्यावर बडतर्फीची (सेवामुक्तीची) कारवाई करण्यात आली आहे.