आत्मनिर्भरतेच्या बळावर भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न साकार करणार ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

अमित शहा

बेळगाव, १८ जानेवारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. विविध क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भरतेचा मार्ग निवडून विकासाची वाटचाल चालू आहे. संपूर्ण देशाचा सर्वदृष्टीने विकास करून जगात महासत्ता बनवण्याचे स्वप्न नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साकार होईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा यांनी केले. येथील जिल्हा क्रीडांगणावर आयोजित जनसेवक समावेश या कार्यक्रमात १७ जानेवारी या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यासह अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

 श्री. अमित शहा या वेळी म्हणाले की,

१. देशात चार पिढ्या सत्तेवर असतांना काँग्रेसने देशाला काय दिले ?, याचा हिशोब द्यावा. मोदी सरकारने केंद्रात सत्ता हाती घेतल्यावर ज्वलंत प्रश्‍न यशस्वीरित्या हाताळल्याने देशातील जनतेने भाजपला दुसर्‍यांदा सत्ता सोपवली.

२. काँग्रेस नेहमीच निरर्थक विरोधाचे राजकारण करते. कोरोनाच्या संदर्भात जगाला भारताची काळजी वाटत होती; मात्र केंद्र सरकारने याचा यशस्वीपणे सामना केला. जगात सर्वाधिक अल्प मृत्यूदर भारतात आहे. जगातील सर्वांत मोठ्या लसीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला आहे. यातही काँग्रेसने खोडा घातला आहे. काँग्रेस लसीकरणाविषयी जनतेच्या मनात गैरसमज पसरवत आहे.

३. चीनसमवेत व्यावसायिक स्पर्धेसाठी भारत सज्ज झाला आहे. देशातील पहिला खिलोना क्लस्टर कर्नाटकातील कोप्पळ येथे निर्माण होत आहे. १ लाख ३२ सहस्र ग्रामपंचायती ब्रॉडबँडने जोडण्यात आल्या आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. १३ कोटी लोकांच्या घरी केंद्र सरकारने गॅस पोचवला.

विशेष

१. श्री. अमित शहा यांनी त्यांच्या भाषणात बेळगावचा उल्लेख बेळगावी न करता बेळगाव असाच केला. यामुळे मराठी भाषिकांनी समाधान व्यक्त केले.
२. श्री. अमित शहा यांना भगवा फेटा बांधण्यात आला होता. त्यांच्या भाषणात श्री. शहा यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत भगवा फडकवण्यात आल्याचा आनंद व्यक्त केला.