महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतींचे निकाल लागण्यास आरंभ

मुंबई – १६ जानेवारी या दिवशी पार पडलेल्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागायला आरंभ झाला आहे. कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा येथील काही निकाल आता समोर येत आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे आणि नाशिक जिल्ह्यात येथे विजयी मिरवणुका काढण्याची जिल्हाधिकार्‍यांनी बंदी घातली आहे. मोठ्या प्रमाणात सगळीकडे शिवसेनेने यश मिळवले आहे, असेही चित्र पुढे येत आहे. कोकणात शिवसेना आघाडीवर आहे.

संभाजीनगर येथील पाटोदा या गावांकडे अनेक जणांचे लक्ष होते. आतापर्यंत गावाचे   पुरस्कार मिळवणारे देखणे आणि स्वयंपूर्ण गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाटोदे येथे गेले २५ वर्षे असलेले भास्कर परे पाटील यांचे वर्चस्व संपुष्टात आले. त्यांची कन्या या वेळी येथे उभी होती आणि तिचा पराभव झाला. नगर येथील आदर्श गाव हिरवे बाजार येथे पोपटराव पवार विजयी झाले आहेत. अहमदनगर येथील आदर्श गाव हिरवेबाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवार यांची पुन्हा सत्ता आली आहे.

भाजपच्या ३ नेत्यांचा त्यांचा गावात पराभव

सिंधुदुर्गातील वैभववाडी येथील भाजपच्या नारायण राणे यांची सोनाळी ग्रामपंचायत शिवसेनेकडे गेली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावातही शिवसेना आघाडीवर आहे. विशेष म्हणजे येथे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत होते आणि शिवसेना एकटी वेगळी होती. लोणीखुर्द येथे भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांना हार पत्करावी लागली आहे.

जळगावमधील कोथळी येथे ५ शिवसेना, तर ५ जागा खडसे समर्थकांना मिळाल्या आहेत. पुण्यातील टोणजे आणि सोलापूरमधील करमाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस, नाशिकमधील पालखेड आणि माळशीरस येथे भाजप आघाडीवर आहे. धाराशिव येथे मधुकरराव चव्हाण यांना यश मिळाले आहे.