सोलापूर जिल्ह्यात ११ केंद्रांवर कोविड लसीकरणास प्रारंभ 

कोविड लसीकरण केंद्राची पहाणी करतांना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

सोलापूर – कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठीच्या कोविड लसीकरणास १६ जानेवारी या दिवशी जिल्ह्यात ११ केंद्रांवर नियोजनबद्ध पद्धतीने प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३० सहस्र १८४ आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी यांना लस दिली जाणार आहे. या वेळी लसीकरण केंद्रावरील कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात उत्साहाचे वातावरण होते.

कोरोनावरील लसीचे २ डोस घेणे आवश्यक असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे आज लस दिल्यानंतर त्याच व्यक्तींना २८ दिवसांनी लसचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालयात डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उपअधिष्ठाता डॉ. पुष्पा अग्रवाल यांनी पहिली लस घेतली.