युरोप येथील साधकांसाठी दाओस (क्रोएशिया) येथे १८ ते २० जुलै २०२० या कालावधीत पहिले, तर २४ ते २६ जुलै २०२० या कालावधीत दुसरे शिबिर घेण्यात आले. जर्मनी, ऑस्ट्रिया, क्रोएशिया, आयर्लंड आणि फ्रान्स या देशांतील साधकांनी या शिबिरांचा लाभ घेतला. या शिबिरांत मनमोकळेपणे बोलणे, व्यष्टी साधना, सेवेतून आनंद मिळवणे, स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या अंतर्गत स्वतःकडून होणार्या चुका शोधणे आणि त्या न्यून होण्यासाठी स्वयंसूचना घेणे इत्यादी विषय घेण्यात आले. साधकांना या शिबिरात संघटितपणा आणि एकमेकांप्रती जवळीक जाणवली. काही साधकांची भावजागृती होत होती, तसेच काहींना ‘आपण रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातच आहोत’, असे वाटत होते. या शिबिरात साधकांना शिकायला मिळालेली आणि जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. श्री. सेबॅस्टियन काम्स् यांनी एका सेवेच्या संदर्भात समन्वय करतांनाचे त्यांचे चिंतन शिबिराच्या एका सत्रात मांडणे
श्री. सेबॅस्टियन काम्स् यांनी एका सेवेच्या संदर्भात समन्वय करतांनाचे त्यांचे चिंतन शिबिराच्या एका सत्रात मांडले. त्यांचे चिंतन ऐकून उपस्थित साधकांचा भाव जागृत झाला, तसेच त्या प्रसंगात श्री. सेबॅस्टियन यांच्या विचारप्रक्रियेतून साधकांना शिकायला मिळाले. ‘लॉग-इन’ सेवेअंतर्गत श्री. सेबॅस्टियन यांनी त्यांचे स्वतःच्या नावाने असलेले ‘अकाऊंट’ अन्य एका साधकालाही वापरण्यास दिले आहे. या सेवेत अन्य साधकाच्या काही सुधारणा असल्यास उत्तरदायी साधक श्री. सेबॅस्टियन यांनाच पाठवतात. आरंभी सेबॅस्टियनदादांच्या मनात ‘लॉग-इन’ची उत्तरे मी लिहिली नसून अन्य साधकाने लिहिली आहेत’, असे उत्तरदायी साधकांना सांगावे’, असा विचार आला; मात्र नंतर त्यांनी विचार केला, ‘असे केल्यास त्या सुधारणांमधून मला शिकता येणार नाही.’ त्यामुळे ‘या चुका माझ्याकडून झाल्या आहेत’, असे त्यांनी स्वीकारले आणि सुधारणांमधून शिकण्याचा प्रयत्न केला. यातून सर्व साधकांना दादांनी केलेले चिंतन आणि साधनेचे त्यांचे योग्य दृष्टीकोन शिकता आले.
२. साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
२ अ. श्री. कार्ल बारवित्स्की, जर्मनी
१. ‘साधकांना ‘आध्यात्मिक कुटुंबाप्रमाणे कसे रहायचे ?’, हे शिकता यावे’, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनीच विदेशातील साधकांना युरोपमध्ये एकत्र आणले आहे’, असे मला वाटले. ‘साधकांनी एकमेकांना साधनेत साहाय्य करून प्रेरणा देणे’, हे आध्यात्मिक कुटुंबाचे वैशिष्ट्य आहे.
२. त्यानंतर मला ‘शिबिरातील प्रत्येक साधक म्हणजे तुपाचा दिवा आहे आणि दिव्याची प्रत्येक ज्योत म्हणजे साधकाचा भाव आहे’, असे दृश्य दिसले. त्या वेळी मला वाटले, ‘जेव्हा साधक संघटित होऊन एकमेकांना साधनेत साहाय्य करतील, तेव्हा आपत्काळरूपी अंधकारमय रात्र नष्ट करण्यास साधकरूपी सर्व दिवे सक्षम बनतील आणि तेथे ईश्वराचे अस्तित्व येईल.’
२ आ. श्री. स्टेफान कोच, जर्मनी
२ आ १. ‘असुरक्षिततेची भावना असणे’ या स्वभावदोषामुळे शिबिराच्या आधी मनात पुष्कळ संघर्ष होणे, त्या वेळी स्वयंसूचना घेतल्यावर शिबिरात मोकळेपणाने बोलता येणे आणि सर्व सत्रांचा आनंदाने लाभ घेता येणे : ‘असुरक्षिततेची भावना असणे’ या माझ्यातील स्वभावदोषामुळे शिबिराच्या आधी माझ्या मनात पुष्कळ संघर्ष चालू होता. माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते आणि मन पुष्कळ अस्थिर होते. शिबिराच्या आधी मी या स्वभावदोषावर स्वयंसूचना घेऊन तो न्यून होण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे शिबिरातील सर्व सत्रांत मी मोकळेपणाने बोलू शकलो आणि सर्व सत्रांचा आनंदाने लाभ घेऊ शकलो, तसेच शिबिरातील साधकांशी जवळीक अनुभवता आली. यातून मला स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याचे महत्त्व शिकायला मिळाले.’
२ इ. गेर्लिंडे दोम्ब्रोव्हस्की, ऑस्ट्रिया
२ इ १. शिबिरातील एका सत्रात निर्विचार स्थिती अनुभवणे, त्या वेळी शांत वाटणे आणि सत्र संपल्यावर बराच वेळ ही स्थिती टिकून असणे : ‘शिबिरातील एका सत्रात माझ्या मनाची निर्विचार स्थिती होती. मला पुष्कळ शांत वाटत होते. ‘कृतीच्या स्तरावर कसे प्रयत्न करणार ?’, याविषयी साधक सांगत होते. त्या वेळीही माझ्या मनात कोणतेच विचार नव्हते. सत्र संपल्यावर बराच वेळ ही स्थिती टिकून होती. ही स्थिती नैसर्गिक होती आणि त्या वेळी मला चांगले वाटत होते.
२ इ २. शिबिरात तळमळरूपी ज्योत स्वतःमध्ये प्रज्वलित करण्याविषयी सूत्र घेण्यात येणे आणि ते केल्यावर ‘स्वतःची साधनेची तळमळ वाढली आहे’, असे वाटणे : शिबिरातील एका सत्रात एक भावप्रयोग घेण्यात आला. तळमळरूपी ज्योत स्वतःमध्ये प्रज्वलित करण्याविषयी तो भावप्रयोग होता. त्या वेळी मी परात्पर गुरु डॉक्टरांना सूक्ष्मातून विचारले, ‘मी स्वतःमध्ये तळमळ कशी वाढवू ?’ त्या वेळी मला माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी एक ज्योत असल्याचे जाणवले आणि ‘माझी साधनेची तळमळ वाढली आहे’, असे मला वाटले. तेव्हापासून प्रतिदिन मी भावप्रयोग करत असून मला चांगला लाभ होत आहे.
२ इ ३. शिबिरात साधक स्वतःच्या चुका सांगत असतांना सद्गुरु सिरियाक वाले यांच्या डोळ्यांत ‘साधकात पालट व्हावा’, ही तळमळ आणि प्रीती जाणवणे अन् त्यामुळे चुका सहजतेने स्वीकारता येऊन त्यांतून शिकता येणे : शिबिरात मला माझ्याकडून होत असलेल्या चुका सांगण्यात आल्या. त्या वेळी मी सद्गुरु सिरियाक वाले यांच्या डोळ्यांत पाहिले. त्यांच्या डोळ्यांत मला ‘माझ्यात पालट व्हावा’, अशी तळमळ आणि माझ्या प्रतीची प्रीती जाणवली. त्यामुळे मला माझ्या चुका सहजतेने स्वीकारता आल्या आणि त्या चुकांमधून मला शिकताही आले. त्यानंतर माझ्या मनातील विचार मी मोकळेपणाने बोलू लागलो.
२ इ ४. साधकांमध्ये संघटितपणा जाणवणे : शिबिरकाळात मला साधकांमध्ये संघटितपणा जाणवला. माझे यजमान एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक नसूनही ते एस्.एस्.आर्.एफ्.च्या कुटुंबातीलच एक वाटत होते. ‘सर्व साधकांनाही ते आपल्यातीलच एक आहेत’, असे वाटत होते.
२ इ ५. मनातील नकारात्मक विचार सहसाधिकेला सांगितल्यावर तो विचार नाहीसा होऊन मनात सकारात्मक विचार येणे आणि त्या वेळी मनातील विचार बोलण्याचा लाभ लक्षात येणे : ‘एकदा माझ्या मनात नकारात्मक विचार येत होते. त्या वेळी मला त्याविषयी सद्गुरु सिरियाक वाले यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे होते; मात्र काही कारणास्तव ते शक्य झाले नाही. त्यामुळे समवेत असलेल्या साधिकेला मी तो विचार सांगितला. त्यावर ती फारशी काही बोलली नाही, तरीही माझ्या मनातील नकारात्मक विचार नाहीसा होऊन मनात सकारात्मक विचार आला. यातून मनातील विचार बोलण्याचा लाभ माझ्या लक्षात आला, तसेच ‘आपल्यात भाव असेल, तर गुरुतत्त्व कोणत्याही माध्यमातून साहाय्य करते’, हे शिकायला मिळाले.’
२ ई. सौ. रेवती बाल्याक, क्रोएशिया
२ ई १. शिबिराच्या कालावधीत नामजपादी उपाय करतांना बालपणातील काही प्रसंग दृश्य स्वरूपात दिसणे, त्यामुळे भावजागृती होणे आणि ‘आपण साधनेच्या योग्य मार्गावर आहेत’, याची निश्चिती होणे : ‘कधी कधी माझ्या मनात ‘मी साधनेच्या योग्य मार्गावर आहे ना ?’, असा विचार येतो. मी करत असलेल्या साधनेविषयी माझ्या मनात असुरक्षिततेची भावना असते. शिबिराच्या कालावधीत दाओस येथे असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला एक अनुभूती आली. त्यांनी दिलेल्या अनुभूतीमुळे ‘मी साधनेच्या योग्य मार्गावर आहे’, याची मला निश्चिती झाली. नामजपादी उपाय करतांना मला बालपणातील काही प्रसंग दृश्य स्वरूपात दिसले. त्या दृश्यांमुळे माझी भावजागृती होत होती आणि ‘भावाची ही अनुभूती केवळ देवच मला देऊ शकतो’, असे मला तीव्रतेने जाणवत होते. ती दृश्ये पाहून ‘माझ्या आयुष्याच्या आरंभापासून देव माझ्या समवेत आहे’, याची मला जाणीव झाली. ‘भाव अनुभवण्याची ही तळमळ माझ्यात लहानपणापासूनच होती’, हे त्या दृश्यातून मला कळले. कदाचित् त्यामुळेच मी नेहमी चर्चमध्ये जात असे आणि तो भाव तेथे अनुभवण्याचा प्रयत्न करत होते; परंतु त्या वेळी ते साध्य होत नव्हते. मी निराश झाले होते आणि अध्यात्माविषयी माझा रस नाहीसा झाला. असे असूनही मधे मधे मला भाव अनुभवण्याची उत्कट इच्छा होत असे आणि त्या इच्छेच्या शोधात मी तीर्थक्षेत्री जात असे. जेव्हा एस्.एस्.आर्.एफ्.च्या एका सत्संगाला मी उपस्थित होते आणि सेवा करण्याची मी अनुभूती घेतली, तेव्हा मला पुन्हा तोच भाव अनुभवायला मिळाला होता. मी आयुष्यभर ज्याच्या शोधात होते, ते मला एस्.एस्.आर्.एफ्.मध्ये मिळाले होते. तेव्हा मला आतून जाणवले, ‘मी साधनेच्या योग्य मार्गावर आहे आणि मी येथेच असणे आवश्यक आहे.’
२ ई २. शिबिराच्या कालावधीत लवकर उठणे, दिवसभर सेवेत असूनही मनावर कोणताच ताण नसणे आणि यातून ‘सत्मध्ये रहाणे किती आवश्यक आहे ?’, हे शिकायला मिळणे : शिबिर संपल्यानंतर मी माझ्या घरी झाग्रेबला परत आले आणि कार्यालयात जायला आरंभ केला. मी दिवसभर केवळ सहाच घंटे काम करूनही पुष्कळ दमत असे. दाओस येथे शिबिरात असतांना मात्र मी लवकर उठत असे, तसेच मी दिवसभर सेवेत असायचे. माझ्या मनात सतत ‘मी आणखी काय करू शकते ?’, हाच विचार असायचा. असे असूनही माझ्या मनावर कोणताच ताण नसायचा. यातून ‘सत्मध्ये रहाणे किती आवश्यक आहे ?’, हे मला शिकायला मिळाले. दाओस येथे शिबिर काळात मला जे काही शिकायला मिळाले, त्यासाठी मी परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु सिरियाक वाले आणि सहसाधक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते.’
श्री. ॲडेल हाफिद, क्रोएशिया
१. शिबिरातील भाववृद्धी सत्संगात श्रीकृष्णाचा नामजप करायला सांगितल्यावर त्या नामजपाविषयी भक्तीभाव न वाटणे आणि त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून ज्या नामजपाविषयी भक्तीभाव वाटतो, तो नामजप करण्यास सांगितल्यावर पंथानुसार नामजप करू लागणे : ‘शिबिरात भाववृद्धी सत्संग चालू असतांना श्री. व्लादिमिर चिरकोव्हिच यांनी आम्हाला डोळे बंद करून नामजप करण्यास सांगितले. मी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करू लागलो. त्या वेळी मला ‘माझ्या पंथानुसार नामजप करण्याऐवजी श्रीकृष्णाचा नामजप करणे अधिक योग्य होईल’, असे वाटले; परंतु आत खोलवर जाणवत होते, ‘श्रीकृष्णाचा नामजप सहजतेने होत नव्हता, तसेच माझ्या पंथानुसार करावयाच्या नामजपासारखा या नामजपाविषयी मला तितका भक्तीभाव वाटत नव्हता.’ ‘कोणता नामजप करावा ?’, याविषयी माझ्या मनात संघर्ष चालू झाला. तेवढ्यात अकस्मात् मला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले दिसले आणि अनावश्यक विचारांत न अडकता ज्या नामजपाविषयी भक्तीभाव वाटतो, तो नामजप करण्यास त्यांनी मला सांगितले. मी माझ्या पंथानुसार नामजप करू लागलो.
२. गाढ ध्यानावस्थेत जाणे, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले साधकाच्या हाताला धरून एका वेगळ्याच विश्वात घेऊन जात आहेत’, असे वाटणे, त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टर दिसेनासे होऊन त्यांच्या ठिकाणी विशाल रूपातील श्रीकृष्ण दिसू लागणे आणि ‘तेथेच थांबावे’, असे वाटणे : काही सेकंदांनंतर मी गाढ ध्यानावस्थेत गेलो. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टर मला हाताला धरून एका वेगळ्याच विश्वात घेऊन जात आहेत’, असे मला वाटले. अकस्मात् परात्पर गुरु डॉक्टर दिसेनासे झाले आणि त्यांच्या ठिकाणी मला श्रीकृष्ण दिसू लागला. त्याचे रूप अत्यंत विशाल होते. त्याच्यासमोर मी अगदीच लहान दिसत होतो. आम्ही कोणत्यातरी भव्य ठिकाणी होतो. तेथे आकाश गुलाबी होते. सभोवतालच्या या गोष्टींचे मला पुष्कळ आश्चर्य वाटत होते आणि त्याविषयी मी चिंतन करत होतो. ‘तेथेच थांबावे’, असे मला वाटत होते.
३. साधकाचा आवाज आल्यावर भावस्थितीतून बाहेर येणे कठीण जाणे आणि त्यानंतर ‘भक्तीभावाने कोणताही नामजप केला, तरी तो आपल्याला एकाच अंतिम लक्ष्याकडे घेऊन जातो’, हे लक्षात येणे : त्या वेळी मला व्लादिमिरदादांचा आवाज ऐकू आला. नामजपामुळे आलेल्या अनुभूती कथन करण्यास ते सांगत होते. मला डोळे उघडणे पुष्कळ कठीण जात होते; कारण मला त्या स्थितीत इतका आनंद मिळत होता की, त्यातून मला बाहेर पडावेसेच वाटत नव्हते. काही वेळाने मी या स्थितीतून हळूहळू बाहेर येऊन डोळे उघडले. एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांच्या उपस्थितीत माझ्या पंथानुसार नामजप करतांना मला लाजिरवाणे वाटले नाही. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘भक्तीभावाने कोणताही नामजप केला, तरी तो आपल्याला एकाच अंतिम लक्ष्याकडे घेऊन जातो.’
४. भावप्रयोग करतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्यासमोर आहेत’, असा भाव ठेवून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टरच आत आहेत आणि तेच आतून उत्तरे देत आहेत’, असे जाणवणे अन् ‘ईश्वराशी, गुरूंशी एकरूप झाल्याची ही स्थिती आहे’, असे सद्गुरु सिरियाक वाले यांनी सांगणे : भाववृद्धी सत्संगाच्या आरंभी श्री. व्लादिमिर चिरकोव्हिच यांनी ‘आपल्यासमोर परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’, असा भाव ठेवून त्यांच्याशी संवाद साधण्यास सांगितले. मी नामजप करू लागलो आणि काही सेकंदांनी ध्यानावस्थेत गेलो. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्यासमोर आहेत’, असा भाव ठेवून मी त्यांना मला साधनेत येत असलेल्या अडथळ्यांविषयी सांगू लागलो. ‘ते माझ्याशी बोलत आहेत’, असा भाव ठेवल्यावर मला उत्तरे मिळू लागली. हळूहळू परात्पर गुरु डॉक्टर दिसणे न्यून होत घेले. ‘मला आतूनच उत्तरे मिळत आहेत’, असे माझ्या लक्षात आले. जणूकाही आतून माझा माझ्याशीच संवाद चालू होता. मला माझी स्वतःची जाणीव होती; परंतु ‘माझ्या आतील आवाज म्हणजे मी नसून परात्पर गुरु डॉक्टरच माझ्या आत आहेत आणि तेच आतून ती उत्तरे देत आहेत’, असे जाणवत होते. भावप्रयोगानंतर मी माझी अनुभूती सांगितली. त्या वेळी सद्गुरु सिरियाक वाले यांनी ‘ईश्वराशी, गुरूंशी एकरूप झाल्याची ही स्थिती आहे’, असे सांगितले.
५. ‘भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न म्हणजे भावावस्था अनुभवणे’ असा समज असणे, एका साधिकेने तिच्या साधनाप्रवासाविषयी सांगतांना तिच्या नकळत साधकाला साधनेत पुढे जाण्यासाठी आवश्यक सूत्रे सांगणे आणि त्या वेळी भावजागृती होणे : कार्यशाळेत सद्गुरु सिरियाक वाले यांनी आम्हाला भाववृद्धी होण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांविषयी सांगण्यास सांगितले. मी नियमितपणे भाववृद्धी सत्संगात सहभागी होत असूनही मी याचा अर्थ केवळ ‘भावावस्था अनुभवणे’ इतकाच घेतला. भाव अनुभवण्यासाठी करायच्या प्रयत्नांचा यात अंतर्भाव नव्हता. त्यामुळे मी याविषयी अधिक जाणून घेतले. कार्यशाळा झाल्यावर चहा घेत असतांना माझे एका साधिकेशी तिच्या साधनेच्या प्रवासाविषयी बोलणे झाले. त्या वेळी मला ‘काळ थांबला आहे’, असे वाटत होते. मी त्या साधिकेचे बोलणे इतक्या एकाग्रतेने ऐकू लागलो की, सभोवतालच्या कोणत्याही गोेष्टीकडे माझे लक्ष नव्हते. मला साधनेत पुढे जाण्यासाठी जे आवश्यक होते, तीच सूत्रे नकळतपणे ती साधिका मला सांगत होती. ते ऐकून मी स्तब्ध होऊन विचार करू लागलो, ‘माझ्या हृदयाला भिडणार्या शब्दांत तिने सर्व सूत्रे कशी सांगितली ?’ त्या सूत्रांतून माझ्या मनातील अडचणींना उत्तर मिळाले. ती जसजसा तिचा साधनाप्रवास सांगत होती, तसतसा तिचा तोंडावळा तेजस्वी दिसत होता. त्या वेळी मला आतून भरून आले.
६. साधिकेशी बोलल्यावर बराच वेळ आनंदावस्थेत असणे आणि ‘कार्यशाळेत सद्गुरु सिरियाक वाले यांनी सांगितल्यानुसार ‘भावजागृतीचे प्रयत्न कोणत्या दिशेने करायचे ?’, हे लक्षात येण्याची देवाने ही अनुभूती दिली’, असे वाटणे : मी कार्यशाळेतील पुढील सत्रासाठी आलो. अजूनही मी त्या अनुभूतीतून बाहेर आलो नव्हतो. पुढचा काही काळ मी निर्विचार स्थितीत होतो. काहीतरी विचार करण्यास स्वतःला भाग पाडण्याचा प्रयत्न केला, तरी माझ्या मनात विचार येत नव्हता. त्या साधिकेशी बोलणे झाल्यावर मी आनंदावस्थेत होतो. बर्याच वेळानंतर ती स्थिती हळूहळू न्यून होत गेली. ‘कार्यशाळेत सद्गुरु सिरियाक वाले यांनी सांगितल्यानुसार ‘भावजागृतीचे प्रयत्न कोणत्या दिशेने करायचे ?’, हे माझ्या लक्षात येण्यासाठी देवाने मला ही अनुभूती दिली’, असे मला वाटले. ‘ईश्वरी तत्त्व आपल्या सर्वांमध्ये कार्यरत असते आणि आपण ते सर्वांमध्ये पाहू शकतो’, हे या अनुभूतीतून मला शिकायला मिळाले. ‘देवाने मला या प्रसंगांतून शिकण्याची संधी दिली. त्यामुळे मी बुद्धीच्या पलीकडे जाऊन अध्यात्मातील सूत्रे आतून समजू शकलो’, याविषयी मी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |