अयोध्या येथील राममंदिर जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल ! – मिलिंद परांडे

सातारा, १५ जानेवारी (वार्ता.) – श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने अयोध्येतील राममंदिर निर्माण कार्य आता गतिमान झाले आहे. मंदिर निर्मितीसाठी समाजातील सर्वच स्तरांतून निधीसंकलन चालू आहे. अयोध्येतील राममंदिर संपूर्ण जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल, असा विश्‍वास विश्‍व हिंदु परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला.

विश्‍व हिंदु परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री मिलिंद परांडे

या वेळी रामदास स्वामी संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब स्वामी, विहिंपचे क्षेत्रिय संघटन मंत्री श्रीरंग राजे, उपाध्यक्ष बाबूजी नाटेकर, प्रदेश संघटन मंत्री विवेक कुलकर्णी, जिल्हा संघचालक सुभाष दर्भे आदी मान्यवर उपस्थित होते.

मिलिंद परांडे पुढे म्हणाले की, अनुमाने ५ शतके हा संघर्ष चालू होता. याविषयी ९ नोव्हेंबर या दिवशी सत्य स्वीकारत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. पुढे केंद्र सरकारने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना केली. न्यासाच्या विनंतीवरून पंतप्रधानांनी ५ ऑगस्ट २०२० या दिवशी श्रीराम जन्मभूमीच्या जागी मंदिर निर्माणासाठी भूमीपूजन केले. प्रस्तावित राममंदिर ३ मजली असेल. प्रत्येक मजल्याची उंची २० फूट असेल. हे मंदिर २.७ एकर जागेवर होईल. मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडामध्ये होणार आहे. सिमेंट आणि लोखंड याचा यामध्ये उपयोग केला जाणार नाही. येत्या ३ वर्षांत हे मंदिर निर्माण करण्याचा मानस आहे. न्यासाच्या विनंतीवरून मकरसंक्रांतीपासून ते माघ पौर्णिमेपर्यंत म्हणजेच १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत निधी समर्पण अभियान संपूर्ण देशात राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून देशातील ४ लाख गावांतून ११ कोटी कुटुंबांपर्यंत पोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे. न्यासाच्या वतीने १ सहस्र, १०० आणि १० रुपयांची कुपन्स निर्माण करण्यात आली आहेत. निधी संकलनासाठी २.५ लाख रामभक्त सेवा देणार आहेत.