श्री हनुमानाला दंडवत घालत वानराने घेतला अखेरचा श्वास !

गुंडेवाडी (जिल्हा सांगली) येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील अद्भुत घटना !

अंनिस आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांना चपराक  !

श्री हनुमान मंदिराच्या द्वाराच्या उंबर्‍यावरच प्राणत्याग केलेले वानर

मिरज (जिल्हा सांगली) – तालुक्यातील गुंडेवाडी येथे २ जानेवारी या दिवशी दक्षिणमुखी हनुमान मंदिरात सकाळी एका वानराने प्रवेश केला. मंदिराला प्रदक्षिणा घालून या वानराने मारुतीच्या मूर्तीकडे पहात दंडवत घालण्यास प्रारंभ केला. हे वानर बराच काळ दंडवत घालत होते. यानंतर काही काळाने नमस्काराच्या मुद्रेतच मंदिराच्या द्वारातच या वानराने प्राण सोडला. विज्ञानाच्या गप्पा मारणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांसाठी ही चपराकच होती.

१. गुंडेवाडी येथील दक्षिणमुखी मारुति पुरातन मंदिराचा जिर्णाेद्धार ६ वर्षांपूर्वी करण्यात आला आहे. या मंदिरात सांगली, मिरज, सातारा, कोल्हापूर, तसेच पंचक्रोशीतून भाविक दर्शनासाठी येतात.

२. २ जानेवारी या दिवशी सकाळी एक वानरांचा कळप मंदिराच्या झाडाजवळ आला. या कळपातील एक वानर अचानक मंदिरात शिरले. ते मंदिराच्या गाभार्‍याच्या उंबर्‍यावर येऊन बसले. या वानराने मारुतीरायाला साष्टांग दंडवत घालण्यास प्रारंभ केला. हे वृत्त गावात पसरले आणि शेकडो ग्रामस्थ हा प्रकार पहाण्यासाठी मंदिरात गोळा झाले. अनेकांनी तिचे चित्रीकरण केले.

३. काही वेळानंतर सदर वानराची हालचाल बंद झाली. शनिवार हा हनुमानाचा वार आणि हनुमान मंदिरातच प्राण सोडल्याची घटना अनेकांना आश्चर्यचकीत करून गेली. नंतर ग्रामस्थांनी टाळ-मृदंगाचा जयघोष करत मंदिराच्या शेजारीच अंत्यसंस्कार केले. या वेळी गुंडेवाडीचे सरपंच श्री. भाऊसाहेब पाटील, सर्वश्री रमेश पाटील, श्रीमंत पांढरे, धनंजय पाटील, प्रशांत गुरव, हिंमत पाटील यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.