भारत-चीन सीमावादावर अद्याप तोडगा निघालेला नाही ! – संरक्षणमंत्री

चीनसमवेतच्या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी चीनवर आक्रमण करून त्याला धडा शिकवणे, हाच एकमेव पर्याय आहे, हेही तितकेच खरे !

नवी देहली – चीनसमवेत लडाखमध्ये चालू असलेल्या सीमावादावर अद्याप काही ठोस निष्कर्ष निघालेला नाही. त्यामुळे आहे तशीच परिस्थिती त्या ठिकाणी कायम आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एका मुलाखतीमध्ये दिली. ‘जर एखादा देश विस्तारवादाचे धोरण अवलंबवत असेल, तर आपल्या भूमीवर घुसण्यापासून त्या देशाला रोखण्याएवढी क्षमता भारतामध्येही आहे’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.


राजनाथ सिंह यांनी सांगितले की, चीनसमवेत चर्चा चालू आहे. लवकरच आणखी एक सैन्यस्तरीय चर्चा होणार आहे. भारत-चीनमध्ये प्रदीर्घ काळापासून सीमावाद चालू आहे. हा वाद अगोदरच संपला असता, तर चांगले झाले असते. जर हा वाद संपुष्टात आला असता, तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. चीन सीमेवर सातत्याने त्याच्याबाजूने पायाभूत सुविधा उभारत आहे; मात्र भारतही सैन्य आणि नागरिक यांच्यासाठी काम करत आहे. आम्ही कुणावर आक्रमण करण्यासाठी नाही, तर स्वतःच्या सुविधांसाठी असे करत आहोत.

लडाख सीमेवर चीनकडून क्षेपणास्त्रे तैनात

चीनच्या वायूदलाने पूर्व लडाख क्षेत्रात मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे आणि रडारयंत्रणा तैनात केली आहे; मात्र भारतानेही कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत. राफेल आणि मिग-२९ ही विमानेही सज्ज आहेत, अशी माहिती वायूदलप्रमुख आर्.के.एस्. भदौरिया यांनी दिली.