हिंदु संस्कृतीनुसार नववर्ष गुढीपाडव्याला साजरे करा ! – दत्तात्रय पिसे, हिंदु जनजागृती समिती

संत आसाराम बापू सत्संग परिवाराच्या वतीने तुलसी पूजन आणि गीता पाठांतर स्पर्धा यांचे आयोजन

सोलापूर, ३० डिसेंबर (वार्ता.) – सध्या अनेकजण पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करून १ जानेवारीला नववर्ष साजरे करत आहे; मात्र हे एक दिवसाचे धर्मांतरच आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री होणार्‍या मेजवानीमुळे (पार्ट्यांमुळे) अनेक हिंदु युवक आणि युवती व्यसनाधीन होतात. त्यामुळे समाजाची अतोनात हानी होत आहे. त्यामुळे हिंदु कालगणनेनुसार नववर्ष गुढीपाडव्याला साजरे करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे यांनी केले. संत आसाराम बापू सत्संग परिवाराच्या वतीने २५ डिसेंबर या दिवशी विडी घरकुल येथे गीता जयंतीनिमित्त तुलसी पूजन आणि भगवद्गीता पाठांतर स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

भगवद्गीता पाठांतराची स्पर्धा

१. या वेळी श्री. दत्तात्रय पिसे पुढे म्हणाले की, भगवद्गीता पाठांतराची स्पर्धा घेऊन मुलांवर चांगले संस्कार करण्याचा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. पू. बापूंच्या भक्तांच्या सेवा कार्यामुळे या स्पर्धांना, तसेच तुलसी पूजन उपक्रमाला यापुढे प्रतिवर्षी वाढता प्रतिसाद मिळेल याची निश्चिती वाटते. आपल्या गुरूंचे कार्य पुढे वाढवणे आणि त्यांचे आज्ञापालन करणे हे शिष्याचे कर्तव्यच आहे. पू. बापूंचे शिष्य हे कर्तव्य म्हणून धर्मरक्षण, संस्कृती रक्षण आणि समाजात चांगले संस्कार रुजवण्याचे चांगले कार्य करत आहेत.

२. गीता पाठांतर स्पर्धेत अनेक लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांचे सर्व उपस्थितांकडून कौतुक केले जात होते. विजेत्या मुलांना श्री. पिसे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. या वेळी मंत्रोच्चारासह सामूहिक तुलसी पूजन आणि पू. बापूंची आरती करण्यात आली. या वेळी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. नरेश रापेल्ली, नरहरी म्याकल, श्री. प्रवीण गुर्रम, श्री. आकाश शिरते यांसह महिला भक्तांनी विशेष प्रयत्न केले.