वाहतूक पोलिसांकडून संघटितपणे चालू असलेला प्रचंड भ्रष्टाचार !

‘वाहतूक पोलीस विभागामध्ये प्रचंड प्रमाणात अनैतिक आणि अवैध मिळकतीचे स्रोत अदृश्य पद्धतीने निर्माण केले आहेत. पूर्वी वाहतूक पोलीस उघडपणे वाहनचालकांकडून पैसे लाचरूपाने घेत असत; परंतु नवीन आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्याने अशा अनैतिक मार्गाने पैसे घेण्यावर बंधने येऊ लागली. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. त्यावर वाहतूक विभागामध्ये काही भ्रष्ट कर्मचार्‍यांनी नवीन नवीन युक्त्या काढून भ्रष्टाचार वाढवला आहे. त्याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

( प्रतिकात्मक चित्र )

१. ठराविक वेळी अवैध वाहतूक करण्याची मोकळीक देऊन त्या वाहनचालकांकडून मासिक हप्ता घेणारे पोलीस !

वाहतूक पोलिसांनी सध्या अवैध किंवा अनैतिक मार्गाने मालाची वाहतूक करणारे वाहनांचे चालक जे प्रतिदिन ठराविक वेळी त्या ठिकाणाहून प्रवास करतात, अशांवर मासिक हप्ता बसवला आहे. उदा. पहाटे २-४ या वेळेत प्राण्यांची अवैध वाहतूक होते. त्यामध्ये गोवंशीय, बकरे, कोंबड्या यांची वाहतूक होत असते. काही व्यापारी कर चुकवण्यासाठी लपूनछपून कापड वाहतूक करतात. ती विशेष करून दुपारच्या वेळी होते. भिवंडी आणि उल्हासनगर येथील कापड व्यापारी अशा प्रकारे त्यांचा माल मुंबईमध्ये आणतात.

२. मासिक हप्ते अथवा गुप्तपणे लाच घेऊन शासकीय दंड न आकारता वाहनचालकांना सोडणे

एखाद्याने वाहतुकीचे नियम चुकवले, तर दंड केला जातो. वाहनचालक दंड न भरता स्वतःहून लाच देत असेल, तर ती कागदपत्रांमध्ये लपवून गुप्तपणे आणि सतर्क राहून स्वीकारली जाते. नियमित वापरातील कालावधी संपला आहे, अशा जड वाहनांची आणि इतर वाहनांची सूची बनवली जाते. अशा वाहनांच्या वाहनचालकांकडून प्रतिमास लाच म्हणून ठराविक रक्कम वाहतूक पोलिसांना मिळते. अनुज्ञप्तीचे (परवान्याचे) नूतनीकरण करणे, अनुज्ञप्ती रहित करणे, वाहतुकीचे नियम मोडणे, ‘पार्किंग’ नसलेल्या जागेत वाहन उभे करणे, ‘ट्रॅफिक सिग्नल’ चुकवणे, वाहनाच्या विम्याची कागदपत्रे नसणे, पीयूसी (Pollution Under Control – वाहनामुळे प्रदूषण होत नसल्याचे प्रमाणपत्र) नसल्यास इत्यादी प्रकरणांत कुणालाही दिसू नये, यासाठी सतर्क राहून लाच स्वीकारली जाते.

३. सिग्नलजवळ झाडाच्या आडोशाला थांबून कारवाई करणे

काही वाहतूक पोलीस सिग्नलच्या ठिकाणी झाडाच्या आडोशाला लपून थांबतात. पोलीस नाहीत, हे पाहून लोक सिग्नल चुकवतात. अशा व्यक्तींना पकडून वाहतूक पोलीस पैसे घेतात. अशा प्रकारे लूटमारी केली जाते.’

– एक निवृत्त पोलीस


गुन्हे नियंत्रण कक्षातच लाचलुचपत नियंत्रित करावी लागणे, ही पोलीसदलावर ओढवलेली नामुष्की !

‘बृहन्मुंबईमध्ये गुन्हे शाखेअंतर्गत गुन्हे नियंत्रण कक्ष (C.B. Control) हा एक विभाग आहे. त्यांच्याकडे भेसळयुक्त पदार्थ विकणार्‍या टोळ्या, तेलामध्ये भेसळ करणारे अशा काळाबाजार करणार्‍यांवर गुन्हा नोंदवण्याचे दायित्व आहे. अशा काळाबाजार करणार्‍या संघटित गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक देवाण-घेवाण होत असते. अशाच एका प्रकरणामध्ये काही वर्षांपूर्वी गुन्हे नियंत्रण कक्षाचे एक पोलीस निरीक्षक प्रमुख होते. त्यांच्याकडे त्याच विभागाचे अप्पर पोलीस आयुक्तांनी (‘अ‍ॅडिशन सी.पी.’नी) पैशाची मागणी केली होती. त्या वेळी त्या पोलीस निरीक्षकांनी मुंबईमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवून सदर अप्पर पोलीस आयुक्तांना (अ‍ॅडिशन सी.पी.) लाच घेतांना पकडले होते. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंद होऊन त्यांना निलंबित करण्यात आले होते. ‘या प्रकरणाचे अन्वेषण त्या वेळच्या कर्तव्यदक्ष साहाय्यक पोलीस आयुक्तांनी केले होते’, असे समजते.’

– एक निवृत्त पोलीस