ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूचा वाढता संसर्ग

युरोपीय देशांकडून  ब्रिटनमधील विमानांवर बंदी

लंडन – ब्रिटनमध्ये नव्या प्रकारचा कोरोना विषाणू आढळला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तिथे दळणवळण बंदी अधिक कडक करण्यात आली आहे. हा ‘स्ट्रेन’ (विषाणू) नियंत्रणाबाहेर असल्याचे तेथील प्रशासनाचे म्हणणे आहे. यामुळे युरोपीय देश सतर्क झाले आहेत. कोरोनाचा हा नवीन प्रकार केवळ ब्रिटनपुरता मर्यादित न रहाता इटली, नेदरलँड, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतही पसरत आहे. परिणामी कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, ऑस्ट्रिया, आयर्लंड, बुल्गेरिया आणि सौदी अरेबिया या देशांनी ब्रिटनला जाणार्‍या विमानांवर तात्पुरती बंदी घातली आहे. भारतानेही ३१ डिसेंबरपर्यंत ब्रिटनमधून येणार्‍या विमानांवर बंदी घातली आहे.

ब्रिटनमध्ये मागील काही दिवसांपासून नव्या प्रकारच्या संसर्गाने बाधित झालेल्यांची संख्या वाढत आहे. ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नवीन ‘स्ट्रेन’ला भारतात येण्यापासून रोखण्यासाठी तात्काळ पाऊले उचलली जावीत, अशी मागणी केली जात आहे. या नव्या स्ट्रेनच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी ‘सरकार सर्तक असून चिंता करण्याची आवश्यकता नाही’, असे म्हटले आहे.