शेतकर्‍यांना हमीभाव देण्याची व्यवस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होणार नाहीत !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कृषी कायद्यावरून स्पष्टीकरण

रायसेन (मध्यप्रदेश) – शेतमालाला हमीभाव देण्याची व्यवस्था (एम्.एस्.पी.) आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या (ए.पी.एम्.सी.) बंद होणार नाहीत. ‘हे दोन्ही बंद होणार’, असा जो प्रचार केला जात आहे तो खोटा आहे, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित शेतकर्‍यांच्या महासंमेलनात दिले. पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायद्यांविषयी निर्माण करण्यात आलेला भ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. ‘कृषी कायद्यांमध्ये सुधारणांवरून विरोधकांना त्रास होत नाही, तर ‘हे मोदी यांनी का केले ?’ यावरून त्रास होत आहे’, असा आरोपही त्यांनी केला.

पंतप्रधान मोदी यांनी मांडलेली सूत्रे

१. शेतकर्‍यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून वार करण्याचा प्रयत्न !

आता शेतकर्‍यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून वार केले जात आहेत. जे लोक शेतकर्‍यांच्या नावावर आंदोलन करत आहेत, त्यांचे सरकार असतांना ‘त्यांनी शेतकर्‍यांसाठी काय केले’ हे सांगायला हवे. त्यांनी स्वामीनाथन् समितीचा अहवाल ८ वर्षे दाबून ठेवला. राजकारणासाठी केवळ वेळोवेळी त्याचा वापर करण्यात आला. आम्ही स्वामीनाथन् समितीचा अहवाल समोर आणला आणि एम्.एस्.पी. दीडपट केला.

२. काँग्रेसकडून शेतकर्‍यांची फसवणूक !

मोदी यांनी काँग्रेसचे नाव न घेता म्हटले की, शेतकर्‍यांची फसवणूक झाल्याचे मुख्य उदाहरण मध्यप्रदेशच आहे. त्यांनी (काँग्रेसने) शेतकर्‍यांना कर्जमाफीचे आश्‍वासन दिले होते. मध्यप्रदेशात त्यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी निरनिराळी कारणे दिली. यानंतर राजस्थानमध्येही तेच केले. हे लोक शेतकर्‍यांची अजून किती फसवणूक करणार आहेत ?

प्रत्येक निवडणुकीपूर्वी शेतकर्‍यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात येते. लहान शेतकरीही यात येतात का ? हे लोक केवळ मोठ्या शेतकर्‍यांचे कर्ज माफ करतात. देशातील लोकांना आता त्यांच्याविषयी सर्वकाही ठाऊक झाले आहे. शेतकर्‍यांपर्यंत पैसा कधी पोचत नव्हता. त्याऐवजी त्यांनी बँकांच्या नोटिसा किंवा अटकेचे वॉरंट मिळत होते.

३. मी सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती करतो. याचे सगळे श्रेय तुम्ही घ्या. याचे सर्व श्रेय तुमच्या सगळ्या जुन्या निवडणूक घोषणापत्रांना देतो. मला शेतकर्‍यांचे कष्ट न्यून  करायचे आहेत. मला त्यांची प्रगती करायची आहे. कृषी क्षेत्रात आधुनिकता आणायची आहे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी सर्व राजकीय पक्षांना केले.