स्वतःच्या खात्यात होणारा भ्रष्टाचार स्वतः मंत्र्यांनीच कठोर कारवाईचा आदेश देऊन रोखायला हवा आणि त्याची माहिती नंतर जनतेला द्यायला हवी ! आता अशा प्रकारे विधान केल्यावर भ्रष्टाचारी सतर्क होतील !
पाटलीपुत्र (बिहार) – माझ्या विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. माझ्या मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्या विभागांमध्येही भ्रष्टाचार होतो. येथे चुकीच्या पद्धतीने व्यवहार होतात, असे विधान बिहारमधील महसूल आणि भूमी सुधारणा मंत्री आणि भाजपचे आमदार राम सूरत राय यांनी केले आहे. मुझफ्फरपूरमधील एका सत्कार सोहळ्याच्या वेळी ते बोलत होते.
१. सत्ताधारी पक्षातील मंत्र्यानेच असे वक्तव्य केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांनी चौकशीची मागणी केली आहे. ‘सध्या मंत्री असणार्या नेत्याने त्याच्या विभागात भ्रष्टाचार होत असल्याचे म्हटले आहे, तर यापूर्वी मंत्री होऊन गेलेल्यांचीही चौकशी झाली पाहिजे’, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.
२. राय यांच्या विधानावर सत्ताधारी पक्ष जनता दल (संयुक्त)चे आमदार खालिद अन्वर यांनी म्हटले की, राम सूरत राय आता मंत्री झाले आहेत. त्यांना अंदाज नसेल; पण नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला थारा दिला जात नाही. बिहार हे असे पहिले राज्य आहे जिथे भ्रष्टाचार प्रकरणी अगदी मोठ्या अधिकार्यांवरही सरकारने कारवाई केली आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये नितीश कुमार हे थेट कारवाई करतात.