ममता बॅनर्जी यांनी नड्डा यांच्या वाहनताफ्यावरील आक्रमणाविषयी क्षमा मागावी ! – बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची शक्यता

डावीकडून राज्यपाल जगदीप धनकड आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

कोलकाता (बंगाल) – राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडलेली आहे. बंगालची सुरक्षा करणे माझे दायित्व आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राज्यघटनेचे पालन करावेच लागणार आहे. भाजपाध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांच्या वाहनताफ्यवार झालेल्या आक्रमणाविषयी ममता बॅनर्जी यांनी क्षमा मागायला हवी.

मानवाधिकार दिनाच्या दिवशी मानवाधिकारांचे उल्लंघन करण्यात आले. हे आक्रमण लोकशाहीवरील डाग आहे. लोकशाहीत सर्वांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांनी व्यक्त केली आहे. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा अहवाल केंद्र सरकारने राज्यपालांकडून मागवल्यानंतर सरकारने  तातडीने बंगालचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिव यांना देहली येथे बोलवून घेतले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे संकेत राज्यपालांनी दिले आहेत.

दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप नेत्यांच्या ताफ्यावर झालेल्या आक्रमणाच्या घटनेवार ‘हे सर्व नाटक आहे’, असे म्हटले आहे.