सातारा – आधीच्या लोकांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला. कधीपर्यंत समाजाचा अंत पहाणार आहात. आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अन्यथा फार मोठा अनर्थ होईल, याला ही सगळी मंडळी उत्तरदायी असतील. लोक यांना रस्त्यावर येऊ देणार नाहीत, घरात जाऊन जाब विचारतील, असे प्रतिपादन भाजपचे खासदार छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी केले. ते सातार्यात २९ नोव्हेंबर या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
१. देवेंद्र फडणवीस मराठा नसून त्यांनी आरक्षण दिले. देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो. शरद पवारांशी चर्चा करून काही उपयोग नाही. आधीच्या प्रश्नावर त्यांनी आधी उत्तरे द्यावीत.
२. राज्यशासनाचे अधिवक्ता सर्वोच्च न्यायालयात उपस्थित रहात नाहीत. इतरांना जसे आरक्षण मिळाले, तसे मराठा समाजाला आरक्षण द्यावे.
३. कुणाचे नाव घेऊन मी कुणाला मोठे करणार नाही; कारण याला सगळेच उत्तरदायी आहेत.
४. मराठा समाजात जन्माला आलो असलो, तरी मी छत्रपतींच्या विचाराने चालतो. ते सर्व धर्माला सोबत घेऊन चालायचे. या प्रश्नाच्या मूळापर्यंत जात नाही तोपर्यंत मराठा आरक्षण निर्णय मार्गी लागणार नाही. आता पुढची पिढी विचारेल तुम्ही काय केले ? प्रत्येकाला आरक्षण दिले. मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही ? इतर कुठल्याही समाजावर अन्याय झाला तरी आम्ही त्यांचीही बाजू तितक्याच तीव्रतेने मांडू.