नृसिंहवाडीतील (जिल्हा कोल्हापूर) दत्त मंदिरात नियमांचे पालन करत भाविकांकडून दर्शन

दर्शनासाठी खुले झालेले मंदिर आणि दर्शन घेणारे भाविक

नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंद असणारे नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर उघडण्यात आले. गेल्या ८ मासांपासून बंद असणारे दत्त मंदिर उघडल्यावर भाविकांनी सर्व नियमांचे पालन करत दर्शन घेतले. मंदिर परिसराची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण दत्त देवस्थानचे अध्यक्ष श्री. अशोकराव पुजारी, सर्वश्री गुंडो पुजारी, अमोल विभुते, तसेच अन्य विश्‍वस्त यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. पहाटे काकड आरतीपासून सायंकाळी शेजारतीपर्यंत सर्व धार्मिक कार्यक्रम बह्मवृंद आणि त्यांचे सहकारी यांच्याकडून भक्तीभावाने चालू आहेत.

दर्शनासाठी खुले झालेले मंदिर आणि दर्शन घेणारे भाविक

मंदिर खुले झाल्याने आजूबाजूच्या गावांमध्येही चैतन्यमय वातावरण पहावयास मिळाले. गेले ८ मास काही मोजकेच पुजारी नित्य पूजा करत होते. सध्या दर्शनासाठी एकच मार्ग खुला करण्यात आला आहे. भाविकांचे थर्मल टेस्टिंग आणि सॅनिटायझेशन करूनच टप्याटप्प्याने मुख्य मंदिरात सोडण्यात येत आहे. मुख्य दर्शन रांगेसमवेत मुख दर्शन रांगेचीही व्यवस्था करण्यात आली आहे. ध्वनीक्षेपकावरून अत्यावश्यक सूचना भाविकांना सांगण्यात येत आहेत. परिसरातील मिठाई दुकानदारांकडे पेढे, बर्फी, बासुंदी, खवा यांची मोठ्या पद्धतीने विक्री होतांना दळणवळण बंदीनंतर प्रथमच पहायला मिळाले.