अवघा देश आणि राज्य दीपावली साजरा करत असतांना गेल्या आठवडाभरात महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे महिलांसाठी ‘असुरक्षित महाराष्ट्र’ असेच दुर्दैवाने म्हणण्याची वेळ आली आहे. बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात २२ वर्षीय तरुणीवर आम्ल (अॅसिड) आणि पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न प्रियकराने केला. पीडित तरुणीचा उपचाराच्या कालावधीत मृत्यू झाला. यातील धक्कादायक गोष्ट म्हणजे १२ घंटे ही तरुणी रस्त्याच्या बाजूला खड्ड्यांत तडफडत होती. एका महिलेला १२ घंटे कोणतेही उपचार मिळू नये, ही गोष्ट प्रशासकीय यंत्रणेचे धिंडवडे काढणारी आहे, तसेच नागरिकांची असंवेदनशीलता विशद करणारी आहे.
‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या अहवालानुसार महिलांवर बलात्कार करून त्यांना मारून टाकण्याचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. वर्ष २०१९ मध्ये बलात्काराच्या २ सहस्र २९९ गुन्ह्यांची, तर विनयभंगाच्या १० सहस्र ४७२ घटनांची नोंद झाली. महाराष्ट्रातील महिलांविषयीच्या अपराधांच्या गुन्ह्यांपैकी ९४ टक्के खटले प्रलंबित आहेत. गेल्या काही वर्षांत समाजातील नीतीमत्ता वेगाने ढासळत असून कोणत्याही शासनकर्त्यांना त्याच्याशी काहीएक देणे-घेणेच नाही, असेच चित्र आहे. महिलांवर वाढते अत्याचार रोखण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘दिशा’ कायदा करण्याची घोषणा केली; मात्र गेल्या वर्षभरापासून हा कायदा केवळ कागदावरच असल्याची स्थिती आहे.
पोलीस आणि प्रशासन महिलांच्या सुरक्षिततेसाठी काहीच करत नसल्याने काही वर्षांपूर्वी बिहारमधील बुंदेलखंड येथील महिलांना संपत पाल यांनी एकत्र करून ‘गुलाब गँग’ सिद्ध केली. यातील प्रत्येक महिलेने स्वरक्षणाचे प्रशिक्षण घेतले असून प्रत्येकीकडे काठी असते. त्याच प्रकारे सर्वत्रच्या महिलांनीही किमान स्वत:चे संरक्षण करण्यासाठी कराटे, लाठी-काठी यांसारखे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. दळणवळण बंदीच्या काळातही हिंदु जनजागृती समिती ठिकठिकाणी ‘ऑनलाईन’ प्रशिक्षण वर्ग, युवती शौर्यजागृती व्याख्याने आयोजित करते. त्याचा महिला-युवती यांनी लाभ घ्यायला हवा. महिलांनी प्रशिक्षण शिकून स्वतःचे रक्षण स्वतःच करणे, ही काळाची आवश्यकता आहे !
– श्री. अजय केळकर, कोल्हापूर