भारताला ऐतिहासिक, धार्मिक आणि आध्यात्मिक वारसा लाभला असल्याने त्या सर्व स्तरांवर देश वैभवसंपन्न अन् बलशाली झाला आहे. या सर्वांच्या जोडीला भारताला आयुर्वेदशास्त्राचीही देणगी लाभलेली आहे. आयुर्वेदाचा प्रारंभ ब्रह्मापासून झालेला असून त्याला अनुमाने ३ सहस्र वर्षांपासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा लाभली आहे. आज या आयुर्वेदाचा जगभरात स्वीकार केला जातो. त्यातच घडलेली आणखी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे ‘जागतिक आरोग्य संघटना भारतात पारंपरिक औषधांचे केंद्र उभारणार आहे’, असे संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधनोम घेब्रेयेसस यांनी १३ नोव्हेंबरला घोषित केले. ‘कोरोना महामारीच्या काळात भारताने ‘फार्मसी ऑफ द वर्ल्ड’ अशी स्वतःची नवीन ओळख निर्माण केली आहे’, असेही ते म्हणाले. आधुनिकतेच्या युगात संपूर्ण जगात भारताचा होणारा गौरव हा निश्चित आनंददायी आहे.
आधुनिक भारतात आयुर्वेदीय उपचारपद्धतीला शासनमान्यता मिळालेली असून अनेक शिक्षणसंस्थांमध्येही आयुर्वेद शिकवला जातो. आता जागतिक आरोग्य संघटनेच्या घोषणेनंतर आयुर्वेदाला एक प्रकारे जगमान्यताच मिळाली आहे; परंतु भारताने या यशामुळे हुरळून न जाता आयुर्वेद सर्वदूर पोचवण्यासाठी आयुष मंत्रालय, आयुर्वेदीय संघटना, तसेच प्रत्येक वैद्य यांनी सर्व स्तरांवर अथक प्रयत्नांची जोड देणे आवश्यक आहे. प्रत्येक घटकाचेच तेवढे दायित्व आहे.
वर्ष २०१६ मध्ये भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने धन्वन्तरि जयंती हा ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणून घोषित केला. त्यामुळे आपण राष्ट्रीय पातळीवर पोचलो. आता जागतिक आरोग्य संघटनेच्या घोषणेमुळे आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय पातळीचे व्यासपीठ लाभले आहे. जगात भारतीय आयुर्वेदाविषयी आदर आणि तितकीच उत्सुकताही आहे. त्यामुळे भारतानेे या स्थितीचा लाभ घेऊन आयुर्वेदाची विविध दालने जगासमोर उघड करायला हवीत. आयुर्वेदाच्या विविध परिभाषा जगासमोर आणायला हव्यात. जसे की, ‘डायबेटिस’ या शब्दाला ‘प्रमेह’ किंवा ‘मधुमेह’ असे म्हटले जाते. ही परिभाषा लोकांपर्यंत पोचवायला हवी. जेव्हा संपूर्ण विश्व भारताने प्रदान केलेली आयुर्वेदीय जीवनशैली अवलंबेल, तेव्हा तो दिवस खर्या अर्थाने आयुर्वेदाचा, पर्यायाने भारताचा सन्मान करणारा ठरेल.
‘माणसाचे आयुष्य १०० वर्षांचे असावे’, असे आयुर्वेद सांगतो. सुश्रुतसंहितेत म्हटले आहे, ‘आयुरस्मिन् विद्यते, अनेन वा आयुर्विन्दन्ति इत्यायुर्वेदः ।’ याचा अर्थ ज्यात आयु आहे किंवा ज्यामुळे आयुर्प्राप्ती होते, तो म्हणजे आयुर्वेद ! केवळ आयुर्वेदच मनुष्याला १०० वर्षांचे निरोगी जीवन जगण्याची गुरुकिल्ली देऊ शकतो. आयुर्वेदाची ही महानता लक्षात घ्यायला हवी. ऋषिमुनींनी आपल्याला दिलेली ही आयुर्वेदाची अनमोल अशी देणगी टिकवून ठेवायला हवी. जागतिक आरोग्य संघटनेच्या घोषणेनंतर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. आता या आयुर्वेदशास्त्राला सार्वभौमत्वाच्या सिंहासनावर पुनर्स्थापित करणे, हे प्रत्येकाचे दायित्व आहे. ते पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत !