गो उपचार !

नेदरलँडमध्ये (हॉलंडमध्ये) गो उपचार ही नवीन पद्धत रूढ होत आहे. यानुसार गायीला मिठी मारणे, तिला स्पर्श करणे, तिला कुरवाळणे असे प्रकार केले जातात. गायींच्या सहवासात घालवलेला थोडासा वेळ हा संबंधितांना लाभदायक ठरत आहे. गायीच्या शरिराचे उष्ण तापमान, हळूवार होणारे हृदयाचे ठोके आदींमुळे तिला चिकटून बसणार्‍यांना मनःशांती मिळते आणि आनंद मिळतो, तसेच तणावातूनही मुक्तता मिळते, असे समोर आले आहे. आता युरोपमध्येही हे उपचार लोकप्रिय होत आहेत, तसेच अन्य पाश्‍चात्त्य देशांतही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतात गोहत्येला प्रोत्साहन देणार्‍यांना ही चपराक आहे. ‘गाय अन्य प्राण्यांसारखा एक प्राणी असून मांसाहारासाठी त्याची हत्या केल्यास चूक ते काय ?’, असे प्रश्‍न विचारणारे आता गप्प आहेत. महत्त्वाचा प्रश्‍न म्हणजे ‘गो उपचारा’चा भारतात प्रसार का झाला नाही ? पाश्‍चात्त्य देशांमध्ये ‘हायब्रिड’ गायी असतात. त्यापेक्षा भारतात अजूनही बर्‍याच ठिकाणी देशी गायी पाळल्या जातात. देशी गायीचे लाभ वेगळे सांगायला नको. अशा देशी गायींच्या सान्निध्यात राहिल्यास मनःशांतीही लाभते, तसेच आध्यात्मिक स्तरावरही लाभ होतो. त्यामुळे असे उपचार भारतात मोठ्या प्रमाणात होणे अपेक्षित आहे. वास्तविक गायींविषयी बाहेरच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात होणारे संशोधन पहाता भारत सरकारने देशभर गोहत्याबंदी कायदा लागू करणे आवश्यक आहे. असे करण्यास धर्मांधांचा विरोध आहे; मात्र त्यावर मात करून सरकारला कठोर पावले उचलावी लागतील. गोमांसाची निर्यात केल्यामुळे सरकारला मसहूल मिळतो; मात्र गोपालन केल्यास महसुलात भरीव वाढ होऊ शकते. याविषयी सरकारने योजना राबवायला हव्यात. हल्ली समाजही आरोग्याच्या संदर्भात सजग झाला आहे. देशी गायीच्या तुपाचे लाभ सर्वांनाच पटले आहेत. त्यामुळे त्याची मागणीही वाढली आहे. हे लक्षात घेऊन सरकारने गोपालनावर भर दिल्यास देशी दूध, तूप, दही यांची मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल. त्यामुळे गोपालन करणार्‍यांना आर्थिक स्रोतही उपलब्ध होईल. कोरोना महामारीच्या काळात बेरोजगारीचा प्रश्‍न ‘आ’ वासून उभा आहे. शहरातील  लोक आता गावांकडे वळत आहेत. अशा वेळी तरुणांनाही गोपालनाचे महत्त्व सांगून त्यांना त्यासाठी उद्युक्त केल्यास बेरोजगारीचाही प्रश्‍न सुटेल. हे सर्व सरकारच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. ब्राझिलसारख्या देशाने भारतातून गायींची आयात करून तेथे त्यांचे संवर्धन केले. तेथील ‘दुग्ध क्रांती’साठी या भारतीय गायीच लाभदायी ठरल्याचे सांगितले जात आहे. विदेशातील लोकांना भारतीय गायींचे महत्त्व कळत असून ते भारतीय गायींची मागणी करत आहेत. हे लक्षात घेऊन भारतानेही देशी गायींच्या संवर्धनाकडे लक्ष द्यायला हवे. असे केले नाही, तर भविष्यात विदेशातून भारतीय गायी आयात करण्याची वेळ भारतावर येईल. गोरक्षण आणि कृषी यांवर भर दिल्यास भारताला खर्‍या अर्थाने आर्थिक स्थैर्य लाभेल आणि भारत खर्‍या अर्थाने आर्थिक आणि सर्वाथाने सुसंपन्न होईल. त्यासाठी सरकारने मात्र कठोर पावले उचलणे आवश्यक !