ट्रम्प यांचा पुढकाराने आता इस्रायल आणि बहरीन यांच्यात शांतता करार

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्र्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढकाराने इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात नुकताच शांतता करार झाल्यानतंर आता पुन्हा ट्रम्प यांच्याच पुढकाराने इस्रायल आणि इस्लामी राष्ट्र असलेले बहरीन यांच्यात शांतता करार झाला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि बहरीनचे राजा हमद बिन इसा अल् खलीफा यांच्यासमवेत दूरभाषवरून चर्चा केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी या मैत्री कराराची घोषणा केली. या करारामुळे इस्रायल आणि बहरीन यांच्यामध्ये आता राजनैतिक संबंध निर्माण होणार असून विमानसेवा, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, शिक्षण, संरक्षण, कृषी आदी क्षेत्रांत एकमेकांना सहकार्य केले जाणार आहे. हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

(म्हणे) ‘हा पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार !’ – पॅलेस्टाईनचा तीळपापड

पॅलेस्टाईनचा कट्टर शत्रू असलेल्या इस्रायलशी बहरीनने मैत्री करार केल्याच्या घटनेवर पॅलेस्टाईनचा तीळपापड झाला आहे. ‘संयुक्त अरब अमिरातीनंतर आता बहरीनने केलेला हा करार म्हणजे विश्‍वासघात असून पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार आहे’, असे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. इराणनेही बहरीनवर टीका केली आहे. आता बहरीनही इस्रायलच्या गुन्ह्यात भागीदार होणार असून इस्लामी राष्ट्रांना हा मोठा धोका असल्याची ओरड इराणने केली आहे.

संयुक्त अरब अमिरातीने मात्र इस्रायल आणि बहीरन यांच्यातील मैत्री कराराचे स्वागत केले आहे. यामुळे पश्‍चिम आशियासह जगभरात शांतता निर्माण होणार असल्याचा विश्‍वास संयुक्त अरब अमिरातीने व्यक्त केला आहे.