देहातील तमोगुणाचा लय करणारा शाकाहार स्वीकारा आणि ईश्वरापासून दूर नेणारा मांसाहार करणे टाळा !

१. शाकाहार

१ अ. व्युत्पत्ती आणि अर्थ

१. शाक + आहार = शाकाहार. ‘शाक’ म्हणजे पवित्र. शाकाहार म्हणजे पवित्र असा आहार

२. ‘शाकः’ म्हणजे वनस्पती. शाकंबरी नावाची देवी आहे.

१ आ. शाकाहार म्हणजे गर्भजन्य बीजरहित घटक : ‘गर्भजन्य बीजरहित घटक’, म्हणजे ज्यात निर्मितीजन्य कनिष्ठ इच्छारूपी प्रकृतीशी संबंधित गर्भधारणा करू शकणारे बीज नाही, असे घटक. वनस्पतीजन्य योनीत तमोगुणाचे प्राबल्य प्राणीजन्य योनीपेक्षा अल्प (कमी) असल्याने त्यांच्यात संभोगातून उत्पन्न होणार्‍या कामवासना संबंधित निर्मितीचे गर्भजन्य बीज नसते; म्हणून शाकाहाराला ‘गर्भजन्य बीजरहित घटक’, असे म्हणतात.

१ इ. शाकाहारात मोडणारे अन्नघटक : इतर नैसर्गिक, म्हणजेच दुसर्‍या प्राणीजन्य जिवांना जन्म देण्याची क्षमता नसलेले गर्भजन्य बीजरहित घटक शाकाहारात मोडतात. ज्यातून कोणत्याही चल सजिवाचा जन्म होऊ शकत नाही, ते अन्नभाव-भावनारहित, म्हणजेच शाकाहारी असते. वनस्पतीजन्य अन्न शाकाहारी असते. दूध, फळे आणि भाज्या या अन्नघटकांतून कोणत्याही प्राणीजन्य चल सजिवाची निर्मिती होत नसल्याने ते शाकाहारात मोडतात.’

– एक विद्वान (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘एक विद्वान’ या नावानेही भाष्य करतात. १०.३.२००९)

२. शाकाहाराचे महत्त्व आणि श्रेष्ठत्व

अ. ‘शाकाहारात पुरेशी प्रथिने (प्रोटीन्स) असतात.

आ. शाकाहारी लोक चपळ, निरोगी आणि दीर्घायुषी असतात. जॉर्ज बर्नार्ड शॉकडवे शाकाहारी होते. ते ९४ वर्षांपर्यंत निरोगी जीवन जगले.

इ. पश्चिमेकडील विख्यात व्यक्ती शाकाहारी आहेत. प्लेटो, सॉक्रेटिस, ॲरिस्टॉटल, रुसो, गोल्डस्मिथ, मिल्टन, न्यूटन, शेले, वॉल्टेअर, सीझर, वेजनेट, थोरो, टॉलस्टॉय, फिल्ड मार्शल माँटगोमरी, हॅरी व्हीटक्राफ्ट, ब्रिगेडिअर ग्रॉफी, अँथोनी क्विनीज, माल्कम, मुगेरीस इत्यादी. ते सांगतात, माणूस शाकाहारावर निरामय जीवन जगू शकतो.

ई. आधुनिक विज्ञानाने शाकाहाराचे श्रेष्ठत्व निरपवाद सिद्ध केले आहे.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

३. निसर्गनियमानुसार ‘मनुष्याने शाकाहार करणे’, हेच त्याचे धर्मपालन असणे

ईश्वराने सृष्टीची निर्मिती करतांना ‘कोणत्या जिवाने कोणता आहार ग्रहण करावा’, याचे नियम केले. हिंस्र प्राण्यांना दुसर्‍या प्राण्याची हिंसा करून अन्नभक्षण करणे सोपे जावे, यासाठी लांब सुळे आणि वैशिष्ट्यपूर्ण दंतपंक्ती अशी रचना त्यांच्या जबड्यात असते. याउलट मानवाचे समोरचे दात मांस तोडण्यासाठी असमर्थ असतात. ते शाकाहारी अन्नाचे चर्वण करू शकतात. मनुष्याच्या दंतपंक्तींची रचना गायीच्या दातांप्रमाणे असते. निसर्गनियमानुसार गाय केवळ शाकाहारच करते. मनुष्यानेही शाकाहार करणे, हे त्याचे धर्मपालन ठरते.’


व्यक्तीने मांसाहार करण्याची कारणे

१. ‘एखादी व्यक्ती तिला आवडतो म्हणून मांसाहार करते.

२. वाईट शक्तीही एखाद्याकडून स्वतःची वासना पूर्ण करून घेण्यासाठी व्यक्तीला मांसाहार/तमोगुणी पदार्थ खायला लावते. तमोगुण वाढल्याने व्यक्तीला त्रास देणे वाईट शक्तीला सोपे होते.

मांसाहारात गणले जाणार्‍या अन्नघटकाचे उदाहरण आणि त्यामागचे कारण

‘प्राणीजन्य गर्भरूपी धारणा चल सजिवांमध्ये समाविष्ट होत असल्याने अशा उत्पत्तीची क्षमता असलेले घटक मांसाहारात मोडतात. ज्यात गर्भधारणा करण्याची, तसेच दुसर्‍या सजिवाला उत्पन्न करण्याची क्षमता असते, असे प्राणीजन्य बीज मांसाहारात मोडते.

अंडे : अंड्यातून सजीवाची निर्मिती होत असल्याने त्यात प्राणीजन्य गर्भरूपी बीज दडलेले असल्याने ते शाकाहारी अन्न होऊ शकत नाही.’

– एक विद्वान (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘एक विद्वान’ या नावानेही भाष्य करतात. ८.३.२००९)


मांसाहाराचे दुष्परिणाम

१. ‘मांसाहार हे अस्वाभाविक अन्न आहे. त्या अन्नामुळे पचनशक्तीला प्रतिबंध होतो.

२. मांसाहारामुळे रुधिराभिसरण आणि श्वासोच्छ्वास यांत अडथळे येतात. मांसाहारी लोकांना हृदयरोग, छाती आणि पोट यांचा कर्करोग किंवा अन्य रोग होतात.

३. मांसाहारात प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे रोग होतात.

४. मांसाहारामुळे तमोगुणाची वृद्धी होते. त्यामुळे मनुष्य तामसिक आणि आसुरी वृत्तीचा होतो. मांसाहार हा असुरांचा आहार आहे.

५. या आहारामुळे मनुष्य ईश्वरापासून दूर जातो.

६. नियमित मांसाहार करणारे साधनेकडे वळत नाहीत आणि वळल्यास साधनेत टिकत नाहीत.

७. मांसाहारामुळे कामवासनेचे विकार तीव्र होतात.’

(श्री. मोहन चतुर्भुज यांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, २५.५.२००७)


मांसाहाराचा परिणाम विषसेवनाप्रमाणे होणे

१. ‘वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने आहाराकरता एखाद्या प्राण्याची हत्या केली जाते, त्या वेळी मृत्यूभयाने त्या प्राण्याच्या शरिरात ॲड्रीनल आणि नॉरॲड्रीनल हे विषारी रस निर्माण होतात.

२. पशू-पक्ष्यांत ‘ट्रिचिनॉसिस’ या रोगाचे (आजाराचे) ट्रिचिनेला नामक कृमी असतात. मांस खाल्ले की, हे कृमी माणसाच्या आतड्यात मोठ्या प्रमाणावर अंडी घालतात. अंड्यांतून निघालेले कृमी रक्तप्रवाहात वहात जातात आणि शरिरातील स्नायूंच्या तंतूत रुतून बसतात.

त्यांचे पुढे रेणूत (cyst) रूपांतर होते. अन्नातून विष पोटात गेले की, जसे घडते, तसेच नेमके इथेही घडते.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी


‘मनुष्याने शाकाहार करणे’, हेच त्याचे धर्मपालन असून नराचा नारायण बनवण्याचे कार्य शाकाहार करत असणे

‘शाकाहाराने मनुष्य सत्त्वगुणी बनतो. सत्त्वगुणाच्या संवर्धनाने त्याची आध्यात्मिक उन्नती होते, म्हणजेच नरजन्माचे सार्थक करणार्‍या सत्त्वगुणी आहाराचे सेवन करणे, म्हणजेच धर्मपालन करणे. धर्मपालन म्हणजेच योग्य आचारसंहितेचा स्वीकार करून त्याप्रमाणे आचरण करून धर्माला, परिणामी ईश्वराला आवडणे.

शाकाहारातून देहातील तमोगुणाचा लय होतो आणि मनुष्य देवसंस्कृतीकडे प्रवास करू लागतो. नराचा नारायण बनवण्याचे कार्य शाकाहार करत असल्याने तो करणे, हे धर्मपालन करण्याच्या तोडीचेच आहे.’

– एक विद्वान (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘एक विद्वान’ या नावानेही भाष्य करतात. ४.३.२००८)


शाकाहारातील घटकांचे होणारे परिणाम

१. गायीचे तूप, तांदूळ, गहू, डाळी आणि धान्य यांच्या सेवनाने सत्त्वगुणाची वृद्धी होते.

२. म्हशीच्या तुपाच्या सेवनाने स्निग्धता वाढून रक्तातील स्निग्धाम्लाचे (‘कोलेस्टेरॉल’चे) प्रमाण वाढते, तर गायीच्या तुपाच्या सेवनाने रक्तातील स्निग्धाम्लाचे प्रमाण वाढत नाही.

३. गायीचे दूध, तूप, फळे, पालेभाज्या यांत श्रीविष्णुतत्त्व, तर कंदमुळांत पृथ्वीतत्त्व अधिक असते.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सात्त्विक आहाराचे महत्त्व’)


मांसाहारासाठी प्रतिदिन एक कोटी पशूंचा वध केला जात असून हेच जगातील ‘कुपोषण’ या समस्येचे मूळ कारण असणे

‘स्वामी अग्निवेश म्हणाले, ‘‘जगातील सर्वांत मोठी समस्या कुपोषणाची आहे आणि कुपोषणाचे कारण मांसाहार आहे. जगात प्रतिदिन एक कोटी पशूंचा वध केला जातो आणि एकेका पशूसाठी १० किलो धान्याची व्यवस्था केली जाते. जगात होणार्‍या युद्धांचे कारणही मांसाहारच आहे.’

संदर्भ : सनातननिर्मित ग्रंथ ‘सात्त्विक आहाराचे महत्त्व’