युद्धासाठी सिद्ध आहोत का ?

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी त्यांच्या सैन्याला ‘युद्धासाठी सिद्धता करा’, असा आदेश दिला आहे. ‘चीन महायुद्ध करण्याची सिद्धता करत आहे किंवा तो त्या सिद्धतेने दक्षिण चीन सागर, हिंदी महासागर येथे कुरापती काढत आहे’, हे आता जगाच्या लक्षात आले आहे. एकीकडे जग कोरोनाशी युद्ध करत असून त्यात त्याला विजय मिळवता आला नसतांना दुसरीकडे चीन त्याच्या सैन्याला प्रत्यक्ष युद्ध करण्यासाठी सिद्ध रहाण्याचा आदेश देतो, यातून बरेच काही लक्षात येते. म्हणजेच शी जिनपिंग यांनी उघडपणे सैन्याला युद्धासाठी सिद्धता करण्याचा आदेश दिल्यावर चीनच्या मनातील किंवा त्याच्या हालचालींवर शिक्कामोर्तब झाले आहे. चीन विस्तारवादी मानसिकतेने वागत आहे. ‘अमेरिकेऐवजी आपण जागतिक महासत्ता व्हावे’, ही त्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यासाठी त्याने तितकेच श्रमही घेतले आहेत. साम्यवादी विचारसरणीच्या राज्यकर्त्यांनी चीनला त्यासाठी आर्थिकदृष्ट्या आणि संरक्षणदृष्ट्या सक्षम केले आहे. चीनच्या पोलादी भिंतीच्या आत काय चालते, हे जग अजूनही सांगू शकलेले नाही. कोरोनाच्या घटनेवरून हे अधिक स्पष्ट झाले आहे. चीनमधून कोरोनाची उत्पत्ती झाली. असे असले, तरी त्यामागे नेमके कोणते कारण आहे, हे चीनने जगाला सांगितलेले नाही किंवा जगही ते जंगजंग पछाडून शोधू शकलेले नाही, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे आता अशा चीनशी युद्ध करण्याची आपली म्हणजे केवळ भारताचीच नव्हे, तर जगाची सिद्धता आहे का ? असा प्रश्‍न उपस्थित होतो. कारण कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा फटका जगातील सर्वच लहान मोठ्या देशांना बसला आहे. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला आणि आता रशियालाही मोठा फटका बसत आहे. अशा स्थितीत युद्ध करण्याची क्षमता या देशांकडे आहे का ? मग चीनकडे तरी ती कशी असणार ? असाही प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. कोरोनामुळे जगाची आर्थिक स्थिती कोलमडल्याचा परिणाम चीनलाही झाला आहे, हे नाकारता येणार नाही. तरीही अमेरिकेवर दबाव निर्माण करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. चीनची सध्याची आर्थिक स्थिती खुप चांगली नाही, असे अर्थतज्ञांचे मत आहे. तरीही चीनची अन्य देशांच्या तुलनेत अल्प हानी झाली आहे. कोरोनाचे संकट चीनमधून चालू झाल्यानंतरही चीन त्यातून अलगदपणे बाहेर पडला, तर संपूर्ण जग यात खोलपर्यंत अडकले. त्यामुळे कोरोनामागे चीनचेच षड्यंत्र आहे, हे पुन्हा त्याच्या युद्धाला सिद्ध रहाण्याच्या आदेशावरून लक्षात येते. कोरोनामुळे अमेरिकेची मोठी हानी झाल्याने तो संतापलेला आहे. अमेरिका कोरोनावरून चीनचा सूड घेणार, असेच चित्र आहे. त्यामुळेही चीनने युद्धासाठी सिद्ध रहाण्याचे म्हटले असेल, असेही सांगितले जाते. हेही नाकारता येत नाही. तरीही अमेरिकेला आपल्यापेक्षा वरचढ होता येऊ नये; म्हणून आक्रमक पवित्र्यात रहाण्याचा चीनचा प्रयत्न आहे, असेही वाटू शकते. ‘अमेरिकेने चीनच्या विरोधात युद्ध पुकारल्यास भारत तिचा महत्त्वाचा साथीदार असणार आहे, असे चीनला वाटत असल्यामुळे चीनने लडाखमध्ये भारतावरही दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे’, असे म्हटले जात आहे. ते खरेही असू शकते; मात्र त्यामागे दुसरेही एक कारण आहे की, भारताला पाकव्याप्त काश्मीर परत मिळवायचे आहे आणि भारताने त्यासाठी व्युहरचनाही केली आहे. त्याला अप्रत्यक्ष विरोध करण्यासाठी चीनने लडाखमध्ये घुसखोरी करून भारताला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

युद्धाला सामोरे जाण्याला पर्याय नाही !

एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे चीन अशा वेळी अमेरिका, युरोप अन् भारत हे युद्ध करू शकतात का ? असा प्रश्‍न आहे. तर याचे उत्तर ‘नाही’, असे म्हटले, तरी चीनने युद्ध पुकारले, तर या देशांना त्याला सामोरे जावेच लागणार आहे. अमेरिका आणि युरोप यांना थेट याची झळ पोचणार नसली, तरी भारत जात्यात असल्याने तो यात भरडण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे लडाख प्रकरणाकडे पहाता भारताने कोरोनाशी लढा देत चीनसमवेतच्या युद्धासाठी सिद्धता करणे आवश्यक आहे. यासाठी त्याला अमेरिका आणि जपान यांचे थेट साहाय्य मिळू शकते, असे गृहीत धरता येईल. तरीही प्रत्यक्ष रणांगणावर लढण्याची भारताला सिद्धता करावी लागणार आहे. दुसरीकडे चीनच्या आदेशाने नेपाळनेही आपल्याला डोळे वटारून दाखवले आहे. नेपाळ या युद्धात आपल्याला मोठे संकट निर्माण करू शकतो, हे लक्षात घ्यायला हवे. याच वेळी पाकिस्ताननेही आगळीक केली, तर त्या आघाडीवरही भारताला लढावे लागेल. हे महायुद्ध असेल. अशा वेळी भारतीय या लढ्यासाठी सिद्ध आहेत का ?

कोरोनाच्या विरोधातील लढ्यात भारतियांची स्थिती कशी आहे, हे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे धर्मांधांकडून दळणवळण बंदीच्या काळात समाजविरोधी कृत्ये करण्यात आली आणि येत आहेत. प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी त्यांनी राष्ट्रविरोधी कारवाया केल्या, तर त्यांचा बंदोबस्त करण्याची सिद्धता आहे का ? अशा वेळी कोरोनाचे संकट असणारच आहे, त्याच्याशी सामना करत या सर्व आघाड्यांवर लढावे लागणार आहे, ही क्षमता भारतात आहे का ? आर्थिक स्तरावरही भारताला हे युद्ध झेपणार आहे का ? कोरोनामुळे आर्थिक स्थिती वाईट झालेली जनता देशासाठी त्याग करण्यासाठी सिद्ध आहे का ? आदी वस्तूनिष्ठ प्रश्‍न समोर उपस्थित रहातात. असे जरी असले, तरी युद्ध लादले गेल्यावर अशा प्रश्‍नांना काहीच अर्थ उरत नाही, तेव्हा केवळ अस्तित्व टिकवणे हेच एकमेव ध्येय समोर रहाते. दुसर्‍या महायुद्धात ब्रिटन, फ्रान्स आदी मित्रराष्ट्रांची अशी स्थिती होती. जवळपास ५ वर्षे त्यांनी त्या युद्धात स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवले होते. अशी देशभक्ती आणि संयम दाखवण्याची कसोटी भारतीय जनतेकडे असेल आणि हाच देशासाठी आपत्काळ  असणार आहे. गेली अनेक वर्षे संत अशा प्रकारचा आपत्काळ येणार असल्याचे सांगत होते, तो आता चालूच झाला आहे, असे यातून म्हणावेसे वाटते. त्यामुळे शी जिनपिंग यांचा आदेश केवळ चिनी सैनिकांना असला, तरी तो भारतियांना अन् चीनविरोधी देशाच्या नागरिकांनाही लागू होत आहे’, असेच समजायला हवे आणि त्यानुसार सिद्धता केली पाहिजे.