…आणि ट्विटर भगवे झाले !

संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात २ साधूंची पालघर येथे हत्या झाली. हिंदू जागृत झाले आणि त्यांनी प्रश्‍नही उपस्थित केले. या हत्यांच्या प्रकरणी सरकारने २ पोलिसांना निलंबित केले. इकडे हा संघर्ष चालू असतांना दुसरीकडे सामाजिक माध्यमांतूनही संघर्ष चालू झाला. अनेक हिंदुत्वनिष्ठांनी झालेल्या घटनेचा ट्विटरवर निषेध करत #palghar, #justiceforhindusadhus असे ‘ट्रेंड’ चालवले. हे सर्वच ‘ट्रेंड’ देशभरात पहिल्या ५ क्रमांकांवर होते. देशात हिंदु साधूंच्या हत्येसाठी बहुधा पहिल्यांदाच हिंदूंनी एकत्रितपणे ‘ट्रेंड’ चालवून सत्य पुढे आणले. ते इतके पुढे आणले की, काही प्रसिद्धीमाध्यमांनाही नाईलाजास्तव सत्याची बाजू घ्यावी लागली, तर धर्मांधांनी हा विषय झाकण्यासाठी त्याच्याविरुद्ध दुसरा ‘ट्रेंड’ केला आणि येथे ‘ट्रेंड वॉर’ (ट्रेंड युद्ध) चालू झाले.

या ‘ट्रेंड वॉर’ला कुस्तीपटू बबिता फोगाट यांची भूमिका, काही प्रचलित प्रसिद्धीमाध्यमांनी मांडलेल्या सत्य भूमिका, तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी-पुरोगामी मंडळींवर झालेली टीका आणि या सगळ्याला मिळालेली व्यापक प्रसिद्धी असे अनेक पैलू आहेत. हे सगळे इतक्या गतीने झाले की, धर्मांधांना ‘त्याविरुद्ध काय करायचे ?’ असा प्रश्‍न पडला. त्यानंतर ‘व्यक्तीस्वातंत्र्या’चा उपयोग करणार्‍या सोनू निगम यांच्या विरोधात त्यांच्या ३ वर्षांपूर्वीच्या ट्वीटला पुन्हा उकरून काढण्यात आले आणि त्याविषयी ट्रेंड चालवला गेला. त्या वेळी सोनू निगम यांनी ‘सकाळच्या अजानमुळे झालेली झोपमोड आणि कर्कश आवाज’ यांविषयी भाष्य केले होते. त्यानंतर सोनू निगम यांना अनेक हिंदुत्वनिष्ठांनी पाठिंबा दिला होता. त्याच कालावधीत सोनू निगम यांनी त्यांचे ट्विटरचे खाते बंद केले होते. त्यानंतर २०-२१ एप्रिल या कालावधीत झालेल्या ‘sonu nigam’ या ट्रेंडमध्ये काही धर्मांधांनी सोनू निगम यांच्या त्या जुन्या ट्वीटचे छायाचित्र पाठवत टीका केली. या वेळी हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ नागरिक यांनी सोनू निगम यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आणि त्यामुळेच ट्रेंडला व्यापक प्रसिद्धी मिळाली. त्यावर सोनू निगम यांनी ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमातून त्यांना पुन्हा पाठिंबा देणार्‍यांचे आभार व्यक्त केले. हे सर्व होतांना साधूंच्या हत्येचा विषयही ट्विटरवर चालू होता.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या वाटचालीचे प्रथम पाऊल म्हणजे हिंदूंमध्ये जागृती आणि संघटन ! वरील दोन्ही प्रसंगावरून ट्विटरचा योग्य पद्धतीने उपयोग करून हिंदुत्वनिष्ठ संघटित होत आहेत, हे अधोरेखित झाले. ‘सङ्घे शक्तिः कलौ युगे ।’ (अर्थ : कलियुगात संघटितपणातच सामर्थ्य असते.) याचे हे चांगले उदाहरण आहे. हिंदूंनी अशाच प्रकारे हिंदूंवर होणार्‍या प्रत्येक आघाताला परतवून लावायला हवे. ट्विटरचे हे भगवे रूप म्हणजे हिंदु राष्ट्राच्या आरंभातील पावले आहेत, असे म्हटले, तर चूक नव्हे !

– श्री. केतन पाटील, पुणे