मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय, तसेच राज्यस्तरीय वाहिन्या आणि वृत्तपत्रे यांतून काही बातम्या पहायला, वाचायला मिळत आहेत, त्यात एक साम्य हे आहे की, कुठे पत्नीने पतीची हत्या केली, तर कुठे पतीने पत्नीची !
याला कारणे काहीही असतील, विवाहबाह्य संबंध, आर्थिक मागण्या किंवा ओढाताण अथवा काही ठिकाणी तर क्षुल्लक कारणाने वादाचे रूपांतर हत्येत झाल्याचे समजते. या हत्येच्या बातम्यांसमवेतच पतीवर पत्नी करत असलेल्या अत्याचाराचा व्हिडिओसुद्धा नुकताच प्रसारित झाला. घटस्फोट होण्याच्या बातम्या आता सामान्य झाल्या आहेत. या सर्व बातम्या वाचतांना, पहातांना मनात विचार येतो, ‘आपला देश कुठे चालला आहे ?, ज्या देशाला त्याग, शौर्य याचा महान इतिहास आहे, त्या देशाची ही अवस्था ? या परिस्थितीत पालट होण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेणार का ?’
मग आठवते, महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी शाळेतून ‘नैतिक मूल्यसंवर्धन’ हा विषय शिकवण्यास आरंभ झाला होता; पण खरच नैतिक मूल्याचे संवर्धन केवळ काही गोष्टी आणि श्लोक म्हणायला सांगून होणार आहे का ? आजच्या युवा पिढीला जरा योग्य नैतिकता शिकवायची असेल, तर केवळ कृती किंवा विचारात पालट करण्याविषयी सांगून उपयोगाचे नाही; कारण ते मनाच्या स्तरावरील सर्व पालट होतात आणि तात्पुरते असतात. खरोखर नैतिक मूल्य जोपासण्यासाठी, स्वतःमध्ये माणुसकी, मानवता, प्रेम, बंधुत्व आणण्यासाठी, म्हणजे मनुष्यामध्ये अंतर्बाह्य पालट होण्यासाठी खरे तर वृत्तीतच पालट व्हायला हवा आणि हा पालट केवळ अन् केवळ आपल्या हिंदु धर्माचे योग्य आचरण, अध्यात्माचा योग्य अंगीकार करणे, म्हणजे साधना आरंभ करणे, संतांचे मार्गदर्शन घेऊन मनःशांतीच्या मार्गावर रहाणे यांनीच साध्य होणार आहे. साधनेमुळे वृत्ती सात्त्विक आणि अंतर्मुख बनते अन् गुन्हेगारी कृत्य करण्याचे विचार येऊ शकत नाहीत. आज जागतिक स्तरावर भारतीय संस्कृती, शिकवण आणि अध्यात्म यांचे महत्त्व जाणून हिंदु धर्म स्वीकारत आहेत, ते याचसाठी. म्हणूनच आपल्याच देशातील स्थिती जर पालटायला हवी, असे वाटत असेल, तर प्रत्येकाने साधना आरंभ करून केवळ वृत्तीच नाही, तर या मनुष्यजन्माचे सार्थक करून घ्यायला हवे, नाही तर ‘दिव्याखाली अंधार’ अशी आपली स्थिती होईल.
– श्री. वैभव आफळे, गोवा.