बिनकामाचे टवाळखोर ! 

विदेशी लोकांना भारतीय संस्कृतीविषयी एक विलक्षण उत्सुकता असते. भारतीय संस्कृती आणि गड-दुर्ग यांचे अनोखे नाते आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेल्या अनेक गोष्टींपैकी एक, म्हणजे त्यांनी उभारलेले अभेद्य गड-दुर्ग ! त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करणे, हे खरे तर प्रत्येकाचे कर्तव्य आहे; परंतु ती जाणीव कित्येकांना नाही. विदेशातील एक यूट्यूबर सिंहगडावर फिरण्यासाठी आला होता. तो फिरता फिरता त्याला काही मुले भेटली. त्यांनी अश्लाघ्य भाषेचा वापर करून, शिव्या देऊन त्याची खिल्ली उडवली. असा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित होत आहे. या आणि अशा प्रकारचे अनेक प्रसंग सर्रास घडतात. विदेशी स्त्रियांची पर्स किंवा तत्सम गोष्टी चोरण्यापासून त्यांची छेडछाड वा बलात्कारापर्यंत घटना घडतात. अशा प्रकारे या विदेशी तरुणाची खिल्ली उडवणे, त्यांना शिव्या देणे, हे एक भारतीय आणि विशेषतः मराठी माणूस म्हणून आपली मान खाली घालायला लावणारे आहे.

त्या विदेशी तरुणाला सिंहगडाचे महत्त्व वाटले; म्हणून तो तिथे आला होता. वरील घटनेवरून ‘त्याला असलेले सिंहगडाचे महत्त्व त्या तरुण मुलांना मुळीच नव्हते’, असेच म्हणावे लागेल. छत्रपती आणि हा गड सांभाळणारे मावळे यांच्या उंचीला या मुलांनी एकप्रकारे गालबोटच लावले. त्यांनी यावरून ‘आपणच आपल्या संस्कृतीचे, इतिहासाचे, पर्यायाने देशाचे वैरी आहोत’ हे सिद्ध केले. विदेशी लोक ‘भारताला अनुभवण्यासाठी’ आपल्याकडे येतात. मराठी संस्कृतीने आकर्षित होऊन तो युवक इथे आला होता. कदाचित् छत्रपतींचा दैदिप्यमान इतिहास त्याने जगभर पोचवला असता. त्यामुळे आपल्या देशाचा, राज्याचा, छत्रपतींचा मान सर्वत्र उंचावला असता. उलट त्या तरुणापुढे आपल्या देशाची प्रतिमा मलीन होत आहे, याचे काहीच गांभीर्य या मुलांना नव्हते. इतर देशातील तरुणासमोर असा टवाळखोरपणा करून त्यांनी काय मिळवले ? ते देशाची किती हानी करत आहेत, याचे भानही त्यांना नव्हते. राष्ट्रीय संस्कृतीचा अवमान करणार्‍या अशा तरुणांना शिक्षा झाली पाहिजे.

विदेशी विकृतीचे अंधानुकरण करत पब आणि व्यसने यांच्या माध्यमातून तरुण वर्ग पूर्णपणे अंधार्‍या गर्तेत जात आहे. हे सर्वांसाठी धोकादायक तर आहेच; पण सरकार, प्रशासन, पोलीस यांनीही त्यांचे कर्तव्य निभावले पाहिजे. अश्लील आणि बीभत्स ‘वेब सिरीज’, घरभेदी मालिका आणि ऑनलाईन ‘गेमिंग ॲप्स’ यांच्या आहारी गेलेल्या आजच्या तरुणांना दिशा देण्याचे कार्य काही आध्यात्मिक आणि राष्ट्र-धर्म संवर्धन करणार्‍या संस्थांच्या वतीने राबवण्यात येणार्‍या विविध उपक्रमांतून केले जाते. तरुणांनी यात सहभागी होणे का आवश्यक आहे ?, ते यातून लक्षात येते. शालेय जीवनापासून राष्ट्र-धर्म प्रेम शिकवण्याची आवश्यकताही यातून लक्षात येते !

–  श्री. आल्हाद माळगांवकर, देवद, पनवेल