नवी देहली – देशभरात दळणवळण बंदी केल्यामुळे सध्या विविध राज्यांतील परप्रांतीय कामगार स्वतःच्या मूळ गावी परत जात आहेत. अशा स्थलांतरित कामगारांद्वारे कोरोनाचे संभाव्य सामुदायिक संक्रमण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व जिल्हे आणि राज्ये यांच्या सीमा बंद (सील) करण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला. ‘या आदेशाचा भंग करणार्यांना १४ दिवस विलगीकरणात काढावे लागतील’, अशी चेतावणीही सरकारने दिली आहे. मंत्रीमंडळ सचिव राजीव गऊबा आणि केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांचे मुख्य सचिव अन् पोलीस महासंचालक यांच्या समवेत ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे झालेल्या बैठकीत हा आदेश दिला.