फोंडा (गोवा) येथील साधिका सौ. मीनाक्षी राजेंद्र नाईक यांनी शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास होत असतांना अनुभवलेली गुरुकृपा !

सौ. मीनाक्षी नाईक

१. साधनेला आरंभ

अ. ‘वर्ष १९९५ मध्ये सांगली येथे झालेली गुरुपौर्णिमा ही आमची साधनेत आल्यानंतरची पहिली गुरुपौर्णिमा होती.  त्या वेळी आम्ही मडकई (गोवा) येथील श्री. हेमंत काळे यांच्या घरी कापडी फलक (बॅनर) बनवणे, सत्संगात जाणे आदी सेवा करायचो.

२. शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास होत असतांना अनुभवलेली गुरुकृपा !

वर्ष २००५ पासून मला शारीरिक त्रास होऊ लागले. मला ‘अ‍ॅलर्जी’चा तीव्र त्रास चालू झाला. माझ्या हाता-पायांवर सूज येऊन शरिरातील सर्व स्नायू आखडले जायचे. मला हालचाल करता येत नव्हती.

२ अ. शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास होत असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले नामजपाच्या माध्यमातून साथ देत आहेत’, अशी जाणीव होणे : एका महाराजांकडे, तसेच धामसे येथेही उपाय करूनही माझ्या प्रकृतीत काही सुधारणा होत नव्हती. त्यानंतर लक्षात आले, ‘हे आध्यात्मिक त्रासामुळे होत आहे.’ माझे शरीर एवढे बधीर व्हायचे की, कुणी व्यक्ती आल्यास मला भीती वाटत असे. मला बोलताही येत नसे. एवढे तीव्र त्रास होऊनही ‘नामजपाच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले मला साथ देत आहेत’, याची मला जाणीव असायची. मी श्री. राजेंद्र यांना पती म्हणून न पहाता साधकाच्या रूपात पहात होते. या आजारपणात तेच माझे सर्वकाही करत होते. त्यांनी मला अंघोळ घालण्यापासून माझे कपडे धुण्यापर्यंत सर्वकाही केले. परात्पर गुरु डॉक्टरांनीच माझ्या आणि यजमानांच्या नातेवाइकांच्या माध्यमातून सर्व सहकार्य केले.

२ आ. सर्व प्रकारचे औषधोपचार करूनही प्रकृतीत सुधारणा न होणे : आधुनिक वैद्य वेगवेगळ्या माध्यमातून माझ्या आजारपणाचे निदान करत होते; परंतु काही निश्‍चित निदान होत नव्हते. सर्व वैद्यकीय चाचण्या केल्यावर त्यांचे अहवाल सर्वसाधारण असायचे. माझ्यातील ‘हिमोग्लोबीन’चे प्रमाण ३ – ४ असायचे. (सर्वसाधारण प्रमाण १२ ते १४ असते.) मला बाहेरून रक्त द्यावे लागायचे. माझे यजमान स्वतः रक्तदान करत होते. असे ४ वेळा झाले. अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक आणि घरगुती असे सर्व प्रकारचे उपचार करूनही माझ्या प्रकृतीत काही सुधारणा होत नव्हती. त्या वेळी ईश्‍वराने मला सतत साथ दिली.

२ इ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेला प्रदक्षिणा घालणे आणि त्या वेळच्या उदबत्तीची विभूती सर्वांगाला लावल्यावर शरिराने सकारात्मक प्रतिसाद देणे : त्यानंतर आम्ही मडकईचे आमचे मूळ घर सोडून फोंड्यात सदनिका घेऊन तेथे रहायला आलो. तेव्हा अशा स्थितीतही माझे यजमान मला पहाटे ५ वाजता ढवळीला सामूहिक नामजपासाठी घेऊन जात. माझे शरीर घट्ट गोळ्यासारखे झाले होते. त्यानंतर मी उदबत्ती लावून प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेला प्रदक्षिणा घालायचे. मी ती विभूती सर्वांगाला लावत असे आणि प्रार्थना करत असे. ती विभूती हेच माझ्या आजारावर औषध ठरले. माझे शरीर विभूतीला सकारात्मक प्रतिसाद देऊ लागले. ‘विभूतीमध्ये किती शक्ती आहे !’, हे त्या वेळी लक्षात आले.

२ ई. नामजपादी उपायांसह एका आधुनिक वैद्यांचे उपचार चालू ठेवल्याने प्रकृतीत सुधारणा होणे आणि घरातील कामे अन् नोकरी करणे शक्य होणे : त्यानंतर नामजप, विभूतीचे उपाय आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेले उपाय अन् सेवा सतत चालू ठेवले. पूर्वी एक ‘फिजिओथेरपिस्ट’ माझ्यावर घरी उपचार करण्यासाठी येत असे. मी तिला जाऊन भेटले. तिने मला आधुनिक वैद्य भांडणकर यांचे नाव सुचवले. त्यानंतर तेव्हापासून ते आतापर्यंत मी त्यांच्याकडे प्रति ३ मासांनी उपचारासाठी जाते. त्यामुळे मला वैयक्तिक आवरणे, घरातील सर्व कामे, तसेच नोकरी करणे, हे आता शक्य होत आहे. मला नोकरीसाठी बसने प्रतिदिन ८० कि.मी. प्रवास करावा लागतो. मला शारीरिक त्रास होत असूनही मी तेही करत आहे. गुरुकृपेमुळेच हे सर्व शक्य होत आहे.

३. भाव ठेवून साधना केल्याने ‘एक पाऊल टाकल्यास देव दहा पावले टाकतो’, याची सातत्याने अनुभूती येणे

आता ईश्‍वराने ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांची सेवाही घरी उपलब्ध करून दिली आहे. ती सेवा करतांना ‘परात्पर गुरु डॉक्टर समोर बसले आहेत आणि हे माझे हात नसून परात्पर गुरु डॉक्टरांचेच हात आहेत. गुरुदेवांनीच त्या हातात लेखणी धरली आहे. तेच लिहित आहेत’, असा माझा भाव असतो. ‘सेवेची पूर्तताही भगवंतच करवून घेणार’, असा मी भाव ठेवते. ‘आपण एक पाऊल टाकल्यास देव दहा पावले टाकतो’ याची मला सातत्याने अनुभूती येत आहे.

४. यजमानांकडे ‘साधक’ या दृष्टीने पहात असल्याने भीती न वाटणे

एका सत्संगात माझे यजमान श्री. राजेंद्र नाईक यांनी संतांना सांगितले, ‘‘आताच माझे हृदयाचे शस्त्रकर्म (बायपास सर्जरी) झाले आहे. ‘मी सेवेला येऊ शकेन कि नाही, असे मला वाटत होते; पण देवाच्या कृपेमुळेच मला सेवा करता येते. मला सेवेत पुष्कळ आनंद मिळाला.’’ त्या वेळी त्या संतांनी मला विचारले, ‘‘तुम्हाला भीती वाटली नाही का ?’’ त्यावर मी त्यांना म्हणाले, ‘‘मला भीती वाटली नाही. मी श्री. राजेंद्र यांच्याकडे पती म्हणून न पहाता साधक म्हणूनच पहाते आणि साधकहा ईश्‍वराचा सेवक असतो. मी नोकरी करते. कार्यालयात अधिकारी केवळ अधिकार गाजवतात; परंतु येथे पैशाहूनही अधिक अमूल्य अशा आनंदाची प्राप्ती होते.’’

५. कृतज्ञता आणि प्रार्थना

परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे आम्ही येथपर्यंत आलो आहोत. ‘हे गुरुदेवा, आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘आपली कृपादृष्टी आम्हा सर्व साधकांवर असू दे’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

– सौ. मीनाक्षी राजेंद्र नाईक, फोंडा, गोवा. (७.६.२०१९)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक